पुणे : ऑगस्टमध्ये वडिलांना घशाचा त्रास सुरू झाला. जवळच्या डॉक्टरांकडून काही चाचण्या केल्या. मात्र, त्रास वाढतच गेल्याने एका मोठ्या रुग्णालयात चाचण्या केल्या असता डॉक्टरांनी रक्ताचा कर्करोग असल्याचे सांगून बोन मॅरो ट्रान्स्फर करावा लागेल, असे स्पष्ट केले. त्यासाठी किमान ३० लाख रुपये खर्च येईल, असेही सांगितले. ही रक्कम ऐकून पायांखालची वाळूच सरकली.एवढा पैसा कुठून उभा करायचा, असा प्रश्न उभा ठाकला. मात्र, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीसाठी आठवडाभरापूर्वीच अर्ज केला आणि मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला पाच लाखांची मदत जाहीर केली. आम्ही खरंच नशीबवान आहोत. मुख्यमंत्र्यांनी लाखमाेलाची मदत करत माेलाचा आधार दिला आहे, अशी भावना वैद्यकीय मदत मिळालेल्या चंद्रकांत कुऱ्हाडे यांचा मुलगा यश याने बाेलून दाखविली.देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली सही केली, ती कुऱ्हाडे यांच्या मदतीच्या अर्जावर. मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून कुऱ्हाडे यांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. हा पहिलाच निर्णय पुणेकरांच्या मदतीला धावून येणार ठरला. त्यामुळे ‘लोकमत’ने कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला; पण त्यांना बोलता येत नव्हते. त्यामुळे त्यांचा मुलगा यश याने गेल्या चार महिन्यांमधील हकीकतच ‘लोकमत’जवळ कथन केली. यश म्हणाला, ऑगस्टमध्ये वडिलांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे कळले अन् पायांखालची वाळूच सरकली. उपचार तर करावेच लागणार होते, त्यानुसार त्यांना चार वेळा केमोथेरपी केली. त्यासाठी सात लाख रुपयांचा खर्च आला. आता मदतीला धावून आल्याने धीर मिळाला आहे.वडिलांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता. कोरोनाकाळात तो बंद पडला. त्यामुळे घराची जबाबदारी मी आणि माझ्या बहिणीवरच आली होती, हे सांगताना यशचा आवाज घोगरा झाला होता. बोन मॅरो ट्रान्स्फरसाठी ३० लाख रुपये उभे करण्यासाठी वेगवेगळ्या देवस्थान ट्रस्टकडे अर्ज केले हाेते. मात्र, आतापर्यंत कुणीही मदत केली नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, सह्याद्री रुग्णालयातील प्रसाद बडवे यांनी एक पर्याय म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीमध्ये अर्ज करून पाहा असा सल्ला दिला. गेल्या आठवड्यात अर्ज केला होता आणि आठच दिवसांत अर्थात गुरुवारी रात्री आठ वाजता मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची आनंदाची बातमी बडवे यांनी दिली.तीस लाखांपैकी पाच लाख एकरकमी मिळणे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचे त्यासाठी लाख लाख आभार, अशा भावना त्याने बोलून दाखविला. मदतीसाठी राज्यभरातून लाखो अर्ज येतात. मात्र त्यातून आम्हांला मदत मिळाली तीदेखील शपथविधी झाल्यानंतर. आमच्या अर्जावर पहिली सही झाली याचा आम्हाला मोठा आनंद झाला आहे, असेही तो म्हणाला.
आम्ही नशीबवान... मुख्यमंत्र्यांनी लाखमाेलाची मदत करत राखला मान..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 09:20 IST