शेलपिंपळगाव : विधानसभेत माझा पराभव झाला असला तरीसुद्धा खचलो नाही. तसेच यापुढेही खचणार नाही. कार्यकर्त्यांनीही अजिबात खचून जाऊ नये. खेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी सांगितले.
राजगुरूनगर (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या मतदार आभार तसेच कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, माजी सभापती कैलास लिंभोरे, अरुण चौधरी, विनायक घुमटकर, अंकुश राक्षे, माजी उपसभापती विठ्ठल वनघरे, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, जेष्ठ नेते डी. डी. भोसले, उपाध्यक्ष अनिल राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे, विलास कातोरे, संध्या जाधव, संतोष आवटे, बाजार समितीचे संचालक विनोद टोपे, रंजित गाडे, जयसिंग भोगाडे, हनुमंत कड, कमल कड, संतोष गव्हाणे, जयसिंग दरेकर, वसंत भसे, सुरेश शिंदे, चंद्रकांत इंगवले, संतोष गव्हाणे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप मोहितेंना विधानपरिषद द्या जनतेचा ठराव...
माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी तालुक्यातील जनतेकडून मागणी होत आहे. राजगुरूनगर येथील कार्यकर्ता मेळाव्यात तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी मांडलेल्या ठरावाला उपस्थित सर्वांनी दोन्ही हात उंचावून मंजुरी दिली.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकांसाठी पक्षाची ताकद हवी. मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. मात्र कोणत्याही पदासाठी भीक मागणाऱ्यातला मी नाही. आम्ही तुमचे आहोत त्यामुळे सन्मानाची वागणूक द्या एवढीच अपेक्षा आहे. पक्षाने एखाद्या नेत्याला ताकद दिली तरच तालुक्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळते. किंबहुना तालुक्यात पक्षाची ताकद वाढली जाते, असे मोहिते पाटील यांनी सांगितले.
दिलीपराव मोहिते - पाटील यांना विधान परिषदेवर संधी द्यावी ही आपली भावना अजितदादांकडे मांडली जाईल. अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून मोहिते यांची जिल्ह्यात ओळख आहे. मोहितेंचा पराभव झाला असे अजूनही अजिबात वाटतं नाही. तांत्रिक दृष्टीने हा पराभव झाला असेच वाटतंय. राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे दिलीप मोहिते यांना विधानपरिषद देणे शक्य आहे. तुम्हा जनतेची ही मागणी योग्य आहे. - प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.