पुणे: मला अजित दादांनी विधान परिषदेच्या आमदारपदी संधी दिली नाही. दीपक मानकर तुम्हाला संधी देऊ शकत नाही. असं विचारलं सुद्धा नाही. आम्हाला गृहीतच धरलं गेलं नाही. माझ्याकडे राष्ट्रवादीच्या पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. त्या पदाचा मी शनिवारपर्यंत राजीनामा देत असल्याचे सांगत दीपक मानकर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा दिला तरी मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्यपाल नियुक्त कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला
मानकर म्हणाले, २०१२ पासून मी राष्ट्रवादीचे काम करतोय. पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदरी मला दिली आहे. तेव्हा एका जागा पुणे शहराला देण्याची मागणी दादांना आम्ही केली होती. दादांनी याबाबत संपूर्ण जबाबदारी घेतली. दादांनी शब्द दिला कि पाळण्याचे ते काम करतात. आणि ते देणार एक जागा होते. पण परवा पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांचे नाव घेण्यात आले. जर पुणे शहराला एका जागा मिळाली असती तर कार्यकर्त्यांची ताकद वाढणार होती. मी मेरिट मध्ये कुठं कमी पडलो, तुम्ही दीपक मानकरला नाकारण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. शरद पवारांचा बालेकिल्ला याठिकाणी खूप चांगलं काम केलं होत. दीपक मानकर जे काय करतो पैसे न घेता करतो. मला पुढं पुढं करायची सवय नाही हे दादांना माहीत होत, माझी स्पष्ट भूमिका आहे. आता राजीनामा देत आहे. मी कार्यकर्ता म्हणून अजितदादांबरोबर राहणार आहे. दीपक मानकर तुम्हाला संधी देऊ शकत नाही, असं त्यांनी कमीत कमी विचारायला पाहिजे होतं.
कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार
या सक्रिय राजकारणात कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार. तुम्ही भुजबळ साहेबांना सगळं देत बसाल तर आमचं काय होणार ? आम्ही मोहोळ यांचं काम केलं आहे. त्यांच्यासाठी कार्यकर्ते गोळा करून प्रचार केला. मी शनिवारपर्यंत दादांकडे राजीनामा देणार आहे, दादांना आयुष्यभर सोडणार नाही एक कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रात सक्षम महिला
पक्ष संघटना हि कार्यकर्त्याच्या बळावर चालली आहे. एका कार्यकर्त्याला वेगळा आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का? असं म्हणत मानकर यांनी रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षपदावर निशाण साधला. महिला आयोगाचे अध्यक्षपद दुसऱ्या महिलेला द्यावे. रुपाली चाकणकर यांच्यापेक्षा कार्यक्षम महिला महाराष्ट्रात आहेत.