जोपर्यंत ठोस शब्द नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम नाही; अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 01:17 PM2024-10-16T13:17:38+5:302024-10-16T13:18:00+5:30
दीपक मानकरांना विधान परिषदेच्या आमदारपदी संधी न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेच्या आमदारपदी संधी मिळालेली नाही. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला.
राज्यपाल नियुक्त कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. ज्यांच्या घरात आमदार-खासदार, मंत्रिपदे आहेत त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. भविष्यात यामुळे पक्षाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. याची पक्षाकडून दखल घेण्यात यावी. पक्षाच्या कार्यकर्त्याला अजित पवार योग्य न्याय देणार, असा विश्वास आम्हा पदाधिकाऱ्यांमध्ये होता. पण मानकर यांना विधान परिषद आमदार न केल्यामुळे आज त्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत. जोपर्यंत अजित पवार यांच्याकडून ठोस शब्द मिळत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीचे अजिबात काम करणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.