पुणे : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, नागरिक सभेला आले होते. कार्यकर्त्यांनी सभेची जय्यत तयारी केली होती. त्यामध्येच सभेला काही अंध तरुण उपस्थित राहिले होते. यावेळी राज ठाकरे यांनी माणुसकी दाखवत त्यांना सांभाळून व्यास पिठावर घेऊन येण्याचे आदेश दिले होते. सभेनंतर या अंध मुलांना आंदोलनासाठी याल का? असा प्रश्न विचारला असता आम्ही कुठेही यायला तयार आहोत असे उत्तर या मुलांनी दिले आहे.
त्यापैकी उस्मानादाबावरून आलेला मुलगा म्हणाला, मी खास उस्मानाबादवरुन राज ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी पुण्यात आलो आहे. पहिल्यांदा त्यांचे भाषण ऐकले आहे. इतरांचे भाषण ऐकून काही वाटत नाही. पण आज राज ठाकरेंचे भाषण ऐकून फारच छान वाटले. त्यांनी आम्हाला आंदोलनासाठी याल का? असे विचारल्यावर आम्ही लगेच होकार दिला असल्याचे या मुलाने सांगितले आहे.
त्यांनी हात मिळवताच जी प्रेरणा मिळाली ती...
राज ठाकरे आम्हाला स्टेजवर बोलावतील असं वाटलंही नव्हतं. पण त्यांनी आम्हाला पाहून माणुसकी दाखवत इतर पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. कि यांना स्टेजवर बोलवा. तेव्हा आम्हाला विश्वासच बसत नव्हता. कि राज ठाकरेंनी स्टेजवर बोलवलं आहे. त्यांच्या शेजारी बसूनच आम्ही भाषण ऐकत होतो. भाषण झाल्यावर त्यांनी आम्हाला हात मिळवले. त्यानंतर जी प्रेरणा मिळाली ती नक्कीच मला उपयोगी पडेल असे पिंपरीच्या करण अंबाड याने सांगितले.
सामान्य माणसांच्या समस्येवरही बोलायला हवे
सभा सुरु होण्याअगोदर याच अंध मुलांशी लोकमतने संवाद साधला होता. त्यावेळी या मुलांनी राज यांच्या मराठी पाट्या, भोंगे हे मुद्दे महत्वाचे वाटत असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी सर्वच लाऊडस्पिकर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. ती सामान्य नागरिकांसाठी योग्यच आहे. पण त्याबरोबरच राज यांनी महागाई, गॅस दरवाढ याबाबत बोलायला पाहिजे. एखाद्या वेळेस नोकरदार वर्ग गॅस घेऊ शकतो. पण गोरगरिबाने कुठं जायचं. त्यांना गॅस दरवाढ परवडत नाही. जर राज ठाकरेंनी याबाबत भूमिका घेतल्यास दरवाढ कमी होण्याची शक्यता आम्हाला वाटते. असा राज ठाकरेंवरचा विश्वास या अंध तरुणांनी यावेळी व्यक्त केला होता.