पुणे: गिरीश बापट, मी व अंकूश काकडे असे आम्ही तिघेही नगरसेवक होतो. आम्ही दोघे काँग्रेसचे व बापट भाजपचे. तिघेही तरूण. बापट टेल्कोत होते. सकाळी ९ ते दुपारी ४ टेल्कोतील नोकरी करून ते टेल्कोच्याच गाडीने शनिवारवाड्याजवळ उतरत. तिथून महापालिकेत येत. फार काही न बोलताही आमची मैत्री झाली ती बापट साहेबांच्याच स्वभावामुळे. राजकीय अभिनवेश त्यावेळी फार टोकाचा वगैरे नव्हता. तरीही ही मैत्री पुणेकरांच्या कौतुकाचा विषय ठरली. आमच्या एका मित्राने तर आमच्या नावाच्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे गॅस अशा नावाने व्हिजिटिंग कार्डच तयार करून दिली होती. माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांनी सांगितले.
अशी मैत्री होण्याचे कारणही बापटच होते. पक्षाचे आदेश असेल, पक्षहिताच्या प्रश्न असेल त्यावेळी पक्षाबरोबर, मात्र शहरहिताच्या प्रश्नावर कसलीही तडजोड नाही ही भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे आताचे पुल देशपांडे उद्यान असलेला भूखंड, कोथरूडमधील एक मोठा भूखंड आम्ही वाचवू शकलो. हे भूखंड मुळ मालकांना परत द्यावेत असे प्रस्ताव त्यावेळी महापालिकेत आले होते. त्यांना बापट यांच्या अशा भूमिकेमुळे सर्वच पक्षातील तरूण नगरसेवकांनी विरोध केला.
मैत्रीला जागणारा माणूस असेच मी त्यांचे वर्णन करेल
स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर स्कुटरने महापालिकेत येणारा व अध्यक्षपदाची मुदत संपल्यावरही त्याच स्कुटरने घरी जाणारा बापट हेच एकमेव नगरसेवक. राजकारणाबाहेरही आयुष्य असते हे त्यांनी आम्हाला सांगितलेच नाही तर तसे जगायला शिकवले. पक्ष सांगेल त्यावेळी पक्षाबरोबर, इतरवेळी आपले आपण असे ते सांगत असत व वागतही तसेच. सवपक्षीय मैत्री हे त्यांचे वैशिष्ट्य होते व राजकारणाचा पायाही. मात्र त्या मैत्रीत कसलाही स्वार्थ नव्हता. अंकूश काकडे किंवा मी महापौर झाल्यावर आमच्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना झाला. ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले त्यावेळी आम्हीही असेच आनंदलो होतो. राजकारणात पुढे त्यांनी पुढची अनेक पदे मिळवली. याचे कारण समाजाच्या सर्व थरात त्यांनी राखलेले संबध हेच होते. सलग ३ वेळा नगरसेवक, मग सलग ५ वेळा आमदार, कॅबिनेट मिनिस्टर, पालकमंत्री व आता खासदार होणे व तेसुद्दा लोकांमधून निवडून येऊन, हे सोपे नाही. मात्र त्यांना ते सहज गेले. मैत्रीला जागणारा माणूस असेच मी त्यांचे वर्णन करेल. - शांतीलाल सुरतवाला, माजी महापौर