पुणे : राज्यघटनेमध्ये आपण सारे भेद मिटवून टाकले आहेत. पण अजून व्यवहारातून हे भेद गेलेले नाहीत. विज्ञानातसुद्धा पूर्वग्रह असतो. प्रगत देशांत अभ्यासासाठी मिळणारे अनुदान तुलनेने जास्त असते. मात्र, काही ठिकाणी प्रयोग आणि निरीक्षण करायला सुविधा पुरवायच्या नाहीत, असे चित्र दिसते. आपल्या पूर्वजांकडे खूप ज्ञानभांडार होते, अशी आत्मप्रौढी मिरवण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. ज्ञान असले तरी त्याचे जतन आणि संरक्षण करून ते पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची इच्छा असली पाहिजे’,असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्त केले.
मुस्लीम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा सायरा मुलाणी या वेळी उपस्थित होत्या.
नारळीकर म्हणाले, ‘विज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो. त्यामुळे विज्ञान क्षेत्रातही वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिरपेक्ष संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे, शास्त्रज्ञ या शब्दात सगळी शास्त्रे ज्ञात आहेत, असा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ म्हणण्याऐवजी वैज्ञानिक म्हणायला हरकत नाही. प्रत्येक शाळेने आठवड्याच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक तास राखून ठेवला पाहिजे. त्याची उत्तरे शोधून शिक्षकांनी विद्याार्थ्यांचे समाधान केले पाहिजे. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल.’देव न मानणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हेडॉ. मंगला नारळीकर म्हणाल्या, ‘विज्ञान क्षेत्रात काम करणारे लोक देव मानत नाहीत हा गैरसमज आहे. त्यामुळे देव न मानणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन अशी संकल्पना योग्य नाही. देवावर विश्वास आहे का, असे विचारण्यापेक्षाही विवेकवादी राहून तुम्ही पूजाअर्चा कशा पद्धतीने करू इच्छिता असे विचारले पाहिजे. आपण पाप-पुण्याच्या कल्पना स्वच्छ करू. देवाच्या विरोधात शस्त्र उगारण्यापेक्षा धार्मिक रुढींचा आधार घेत दुसºयावर अत्याचार्र ंकवा त्याची पिळवणूक केली जाणार नाही अशी सुधारणा आपण करूया. हाच विवेकवादी आणि मानवतावादी विचार आहे.