इंदापूर (पुणे) : आ. गोपीचंद पडळकर यांच्यावर आम्ही ''चप्पलफेक केली नाही. ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केली. ज्या ठिकाणी हे चप्पलफेक झाली. त्याच ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत बोलताना आंदोलनाचे प्रमुख प्रवीण पवार म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जेथे येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्या ठिकाणी आ. गोपीचंद पडळकर यांना कोणी आणले. आणण्याचे प्रयोजन काय होते. पडळकरांना तो रस्ता माहीत नव्हता. त्यांना चुकीची माहिती कोणी दिली. चुकीच्या रस्त्याने मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी येण्याची जागा कोणी करून दिली. त्यामागचा हेतू काय होता, याची चौकशी झाली पाहिजे. ज्या रस्त्याने सर्वांना ये - जा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्या रस्त्याने ते आले असते, तर त्यास आमचा कसलाही आक्षेप नसता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी, दूध दरवाढ व्हावी म्हणून आंदोलन करणाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. चुकीच्या मार्गाने पडळकरांना आणल्याने दोन्ही आंदोलनांना गालबोट लागले आहे. आम्ही पडळकर गोबॅक अशा घोषणा दिल्या. मात्र, त्यांच्यावर चपला फेकल्या नाहीत. आम्ही त्याचे समर्थन करणार नाही. ज्यांनी हा प्रकार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले.
रोहित पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाचे आंदोलन उभारणाऱ्यांनी चौंडी येथे जाऊन धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आमचा ओबीसी किंवा धनगर समाजाला विरोध नसताना, तसा प्रचार केला जातो आहे. मराठा समाज विरोधात आहे, असे ओबीसी समाजातील काही नेत्यांकडून सांगितले जात आहे. पडळकर येणार हे शनिवारी सकाळी आम्हाला समजल्यानंतर कसला ही वाद - विवाद होऊ नये, यासाठी पडळकरांनी तो दिवसवगळता इतर दिवशी अथवा सभा होण्याआधी ठिकाणी येण्याविषयी बोलावे, असे आम्ही येथील प्रशासकीय अधिकाऱ्याना सांगितले होते. अधिकाऱ्यांनी तसे सांगितल्यानंतरही त्यांना इथे कोण घेऊन आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महादेव सोमवंशी म्हणाले की, गेल्या पन्नास दिवसांपासून शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू आहे. चप्पलफेक प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही. यात कोणी राजकारण आणून भडकावू भाषण करत असेल, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते थांबवण्यात यावेत.