पुणे : बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या उद््घाटनप्रसंगी महापौर प्रशांत जगताप यांनी भामा आसखेड पाणी योजनेत सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अडथळ्यांचा हलकासा उल्लेख केला, त्याचा उद्धव ठाकरे यांनी ‘मतदान नाही म्हणून पाणी तोडण्याची धमकी देणाऱ्यांतले आम्ही नाही’ असे म्हणून समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ ठाकरे यांच्या बोलण्याला होता अशी चर्चा तिथे लगेचच सुरू झालीभामा आसखेड ही पाणी योजनेचे काम आमदार सुरेश गोरे व खासदार शिवाजीराव आढळराव यांनी घेतलेल्या काही हरकतींमुळे अडले आहे. पुण्याच्या पुर्वभागातील नगरररोड, विश्रांतवाडी, खराडी या परिसराचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, त्यामुळे यात लक्ष घालावे असे महापौर जगताप यांनी कलादालन उद््घाटनाच्या कार्यक्रमात प्रास्तविक करताना सुचविले. व्यासपीठावर यावेळी खासदार आढळराव उपस्थित होते. महापौर जगताप बोलून खुर्चीवर बसल्यानंतर पवार यांनी त्यांचे हात दाबून चांगले बोललात असा संकेतही दिला.ठाकरे यांनी नंतर बोलताना याचा समाचार घेतला. ते म्हणाले,‘‘ मतदान केले नाही म्हणून पाणी तोडा, त्यांची कामे करू नका असे म्हणणाऱ्यांमधील आम्ही नाहीत. कामे ही जनेतासाठीच करायची असतात. तसे केले नाही तर जनता जागेवर ठेवणार नाही. जनतेला साधीभोळी समजू नका. तुम्हाला त्यांनी निवडून दिले तर आम्हालाही त्यांनीच दिले आहे. कोणाचे काय म्हणणे आहे ते समजून घ्या, एकत्र बसा व ठरवा काय करायचे ते. जनतेचे समाधान होणे महत्वाचे आहे.’’
पाण्यासाठी आम्ही धमकी देत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2016 1:04 AM