पुणे : काॅंग्रेसने देशासाठी त्याग करणारे चार गांधी दिले. त्यामध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा समावेश होतो. भाजपने मात्र देशाला तीन मोदी दिले आहेत. त्यामध्ये ललित मोदी, नीरव मोदी आणि नरेंद्र मोदींचा समावेश आहे. माेदींनी साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे अशी स्थिती राममंदिराबाबत अाणि राफेल की किमत नही बताएेंगे अशी परिस्थीती राफेल विमानाबाबत असल्याचे मत काॅंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. तसेच अाम्हाला अच्छे दिन नकाे तर पुर्वीचे सच्चे दिन हवे अाहेत असेही त्या ठणकावून म्हणाल्या.
काॅंग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. काॅंग्रेस पक्षाच्या देश, राज्य व पुण्याच्या विकासात काॅंग्रेसने केलेल्या भरीव योगदानाविषयी व गेल्या साडे चार वर्षात नरेंद्र मोदी यांनी देशातील स्वायत्त संस्था संपुष्टात आणल्याचे चित्र खूप झाली मन की बात, येऊन पहा काम की बात या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनानंतर पत्रकार परिषदेत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.
चतुर्वेदी म्हणाल्या, भाजप सरकारकडे त्यांनी केलेल्या कोणत्याही कामाची नोंद नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरमध्ये या सरकारविरोधी रोष आहे. सन १९८० पासून धर्म आणि जातीमध्ये फूट पाडण्याचे काम भाजप करीत आहे. त्यागाच्या नावावर राजनैतिक पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. साडेचार वर्षात देशाला दिलेली वचने त्यांनी पूर्ण न करता केवळ विश्वासघात केला आहे. अटलबिहारी वाजपेयी एका कार्यकाळापुरतचे प्रधानमंत्री होते. ती वेळ भाजपावर पुन्हा येणार असून नरेंद्र मोदी सरकारचा देखील सत्तापालट होणार आहे. देवाला जाती-धर्मामध्ये विभागण्याचे काम त्यांनी केले आहे. सबका साथ सबका विकास ऐवजी कुछ का साथ कुछ का विकास याप्रमाणे हे सरकार काम करीत आहे. सुटा-बुटातील त्यांच्या मित्रांचाच फायदा करुन दिला जात आहे.