'आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो', अजितदादांबाबत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:21 PM2024-06-06T20:21:06+5:302024-06-06T20:23:33+5:30
देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारली
पुणे : महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारत यंदाच्या लोकसभेत समाधानकारक जागा मिळवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला १० पैकी ८ जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच जाग मिळाली आहे. शरद पवारांनी नवीन चिन्ह, नाव या जोरावर ८ जागा मिळवून दाखवल्या आहेत. पण अजित पवारांना हे जमले नसल्याचे निकालावरून दिसून आले आहे. या निवडणुकीत देशभर चर्चा झालेल्या नणंद भावजयच्या लढतीत सुप्रिया सुळेंनी बाजी मारलीये. लाखांच्या लीडने सुप्रिया जिंकून आल्याने महाराष्ट्रात त्यांचे कौतुक केले जात आहे. या विजयी जल्लोषात सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना अजितदादांबद्दल सूचक वक्तव्य केलंय. आम्ही मोठ्यांना सल्ले देत नाही, त्यांच्याकडून सल्ला घेत असतो.
खासदार सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुण्यात प्रथमच मार्केटयार्डात येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यभिषेक दिन निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रथम मार्केटयार्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकारांनी सुप्रिया सुळे यांना अजित पवारांचा फोन आला होता का? असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, कालपासून मी खूप गडबडीत आहे. संसदेत पेपर वर्क खूप असतो. मला झोपायला पण वेळ मिळाला नाही. रात्री दीड वाजता मी घरी आले. मला सोशल मीडिया, मेसेज, फोन कॉल बघायला वेळच मिळाला नाही. आता तर माझा मोबाईलही माझ्याकडे नाहीये. असं त्या म्हणाल्या आहेत. तुम्ही दादांना काय सल्ला द्याल या पत्रकारांच्या प्रश्नावर, सुप्रिया सुळेंनी सूचक वक्तव्य केलं आहे. मी एक मराठी संस्कृतीमधील महिला आहे. आम्ही मोठ्या लोकांना सल्ले देत नाही. त्यांच्याकडून सल्ला घेत असतो.
विकास करणे हेच खरे कार्य
महाराष्ट्रात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी मोठी आव्हाने राज्याच्या समोर होती. सर्वत्र राज्यभर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी छावण्याची मागणी असून ती मान्य होत नाही. चारा डेपो नसून पाण्याचे टँकर देखील वेळेवर पोहोचत नाहीत. या सर्व प्रकाराला राज्यातील जनता त्रस्त झालेली आहे. जनतेने महाविकास आघाडीला दिलेली साथ यामुळे कामाची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून यापुढे आणखीन जबाबदारी वाढलीये. काम करीत राहणे आणि विकास करणे हेच खरे कार्य असल्याचे सुळे यांनी सांगितले.
दुष्काळासाठी मदत करा
राज्यात तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची अडचण असून, शेतीला पाणी नाही. यामुळे रोहित पवार आणि मी उद्या पासून महाराष्ट्र दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी जेसिबी, क्रेनच्या साहाय्याने स्वागत करू नका त्यापेक्षा चारा छावणी, पाणी आणि दुष्काळासाठी मदत करा असे आवाहनही सुळे यांनी केले.