लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आम्हाला ‘स्मार्ट सिटी’, ‘मेट्रो सिटी’ नको, तर आम्हाला हवीये ‘सेफ सिटी’...अशा शब्दांत पुण्यातील विविध क्षेत्रातल्या मान्यवर महिलांनी लोकमत ‘ती चा गणपती’च्या व्यासपीठावर आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यातील दिवसेंदिवस महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक संकल्प करण्यात आले. पुण्यात महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी ‘ड्रायव्हर मावशी’ आणि ‘ती’चे ॲप सुरू करण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.
महिला सक्षमीकरणाच्या चळवळीला बळकटी देण्याच्या दृष्टीने आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला ’ती च्या गणपती’ चा हा प्रवास आता ‘संकल्पसिध्दी’पर्यंत येऊन पोहोचला आहे. राजकारण, समाजकारण, कला, वैद्यकीय, आर्थिक अशा विविध क्षेत्रामधील महिला गेल्या आठ वर्षांमध्ये ‘ती’चा गणपती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. बाप्पाच्या साक्षीने त्यांनी संकल्पांचा ध्यास घेतला आणि ध्यासपूर्तीपर्यंत आजवर वाटचालही केली आहे. म्हणूनच, यंदाच्या ‘ती’ चा गणपतीचे महत्त्व ’बाप्पा संकल्पसिध्दीचा’ यादृष्टीने अधोरेखित होत आहे. ‘ती चा गणपती’च्या संकल्प सिद्धीअंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये रॉयल टेस्टाच्या मालक निकिता माने, डब्लूआयसीसीच्या उपाध्यक्ष मोनिका जोशी, उद्योजक ऐश्वर्या कर्नाटकी, तपस एल्डर केअर होमच्या प्राजक्ता वढावकर, रुपाली बालवडकर, उमा ढोले पाटील, संगीता ललवाणी, अभिलाषा भेलुरे, अंजना मरसर्निक्स , माधवी गोश, सोनिया अगरवाल कंजोटी, दिव्या चव्हाण, खुशाली चोरडिया, लुक्येशा मर्लेजना, रंजना लोढा, मैथिली गायकवाड, के आर अष्टेकर ज्वेलर्सच्या संचालिका पूनम अष्टेकर, मनीषा अष्टेकर, पीएनजी 1832 नळस्टॉप शाखेच्या संचालिका दीपा गाडगीळ आणि सिलाई वर्ल्डच्या संचालिका कीर्ती गुजर, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे सहभागी झाल्या होत्या.
यावेळी न्याती ग्रुपच्या सुलेखा न्याती, ॲड. दिव्या चव्हाण, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, रोझरी स्कूलचे संस्थापक विनय अऱ्हाना आणि ‘ती चा गणपती’ च्या अध्यक्ष सुषमा नेहरकर-शिंदे उपस्थित होत्या. लीना सलढाणा यांनी हा कार्यक्रमात एकसूत्रात उत्तमपणे गुंफला.
------------------------------------------------------------------