पुणे : पुण्यातील सिंहगड रोड भागात खडकवासला धरणातील विसर्गामुळे सोसायटीमध्ये पाणी शिरले. अनेकांच्या तर घरात पाणी शिरले होते. पार्किंगमधून गाड्या काढणेही अवघड झाले होते. सकाळच्या सुमारास रस्त्यांवर २ ते ३ फूट पाणी साचले होते. त्यामुळे सामान्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. प्रशासनाच्या मदतकार्याने नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले. या सर्व पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिंहगड परिसरातील एकतानगरी आणि निंबजनगरी भागात पाहणी केली. त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
एकतानगरी भागातील नागरिकांनी अजित पवारांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. आम्हाला पाणी सोडणार याची काहीच कल्पना नव्हती. सकाळी अचानक आमच्या सोसायटीच्या खाली पाणी येऊ लागले, मग आमची धावपळ सुरु झाली, प्रशासनाने आम्हाला काहीच कळवलं नाही. दादा अगोदर इथल्या नागरिकांना कळवणं गरजेचं होत. लवकर कळलं असत तर आम्ही तशी तयारीही केली असती. दरवेळी पाणी सोडल्यावर एवढं पाणी येत नाही. पण यावेळी एवढ पाणी सोडणार असल्याचे काही सांगण्यात आले नाही. त्यामुळे सकाळी लोक घाबरून गेली होती.
अजित पवारांनी दिले आश्वासन
अजित पवारांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यांनतर अधिकाऱ्यांना योग्य ते नियोजन तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्या भागात एनडीआरएफ आणि लष्करी जवान तैनात करण्यात आल्याचे अजित पवारांनी नागरिकांना सांगितले आहे. प्रशासनाचे अधिकारी तुमच्या भागात असतील काही मदत लागल्यास त्यांना संपर्क करा असेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. एकतानगरीच्या मागच्या बाजूला नदी आहे. त्याठिकाणी पाणी न येण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का? याबाबत जलसंपदा अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे .