पुणे : प्रतिनिधी
‘आमचे नाते विचारांचे - आम्ही वारस विवेकाचे’, ‘आवाज दो - हम एक है’, ‘विवेकाचा आवाज - बुलंद करू या’ या घोषणा देऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आठव्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने डॉ. दाभोलकर यांचा खून झाला, त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर अभिवादन कार्यक्रम आयोजित केला होता. गीतांद्वारे अभिवादन करून मेणबत्ती पेटून विवेक जागर केला. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष महादेवराव भोईभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, प्रधान सचिव माधव बावगे, संजय बनसोडे, नंदकिशोर तळाशीलकर, सरचिटणीस विनायक सावळे, सुरेखा भापकर, बबन कानकिरड, डॉ. गोराणे, सांस्कृतिक विभागाचे कार्यवाह योगेश कुदळे, प्रकाशन विभागाचे विशाल विमल, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अजय भालकर, शिवाजीनगर पुणे शाखेचे अध्यक्ष वनिता फाळके, कार्याध्यक्ष संदीप कांबळे, सचिव विनोद खरटमोल आणि विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होणे आणि मारेकरी न पकडले जाणे, हे मूलतत्त्ववादी प्रवृत्ती वाढल्याचे द्योतक आहे. मूलतत्त्ववादी प्रवृत्ती हे लोकशाहीला मारक आहे, असे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. सर्वच सरकारांना दाभोलकरांचे मारेकरी माहीत आहेत, पण ते राजकीय स्वार्थासाठी त्यांना पकडत नाहीत, असे मत मानव कांबळे यांनी व्यक्त केले.
विशाल विमल यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन केले. संजय बनसोडे, योगेश कुदळे, अजय भालकर यांनी गाणी सादर केली. माधव बावगे यांनी डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील दिरंगाईबद्दल माहिती दिली. ॉड. परिक्रमा खोत, क्रांती दांडेकर, संदीप कांबळे यांनी निर्धार व्यक्त केला.