पुणे : एकदा पत्नी बरोबर एका ठिकाणी खायला गेलेलो असताना रस्त्यातील गटारीचे पाणी पिणाऱ्या मनोरुग्णाला पाहून आम्ही दोघेही हेलावलो. त्या मनोरुग्णाला घेऊन आमच्या छोट्या हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी आम्ही दोघेच तिथे काम करत होतो. आम्हीच त्याला स्वच्छ केले, स्वतःच्या हातांनी भरवले, त्याच्यावर उपचार केले. तो तरूण बरा झाल्यानंतर तो आंध्र प्रदेशचा असल्याचे कळले. त्याच्या घरच्यांशी संपर्क केल्यावर त्याचे वडील त्याला घ्यायला आले. बीएसस्सी झालेला तो तरूण बरा होऊन स्वतःच्या घरी गेला, त्यावेळी जगातील सगळ्यात मोठे समाधान मला मिळाले. रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. भरत वाटवानी अापले अनुभव कथन करत हाेते.
इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिष शेट्टी आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी मानसशास्त्रज्ञ डॉ. सुखदा चिमोटे यांनी संवाद साधला.
आजही आपल्या समाजामध्ये मनोविकारांकडे सकारात्मकपणे पाहिले जात नाही. शारिरीक व्याधींप्रमाणे मानसिक आजाराकडे पाहण्याची गरज आहे. समाज हा एकाचवेळी वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या मानसिक पातळींवरच्या लोकांनी तयार झालेला असतो. शिवाय जीवनशैलीतील बदलाच्या वेगाचा समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत समाजाने मनोरूग्णांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची गरज असल्याचा सूर मनोविकार आणि मनोविकास क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांच्या परिसंवादात उमटला.
वाटवानी म्हणाले, घरातले सगळे सोने विकून पाच खाटांचे छोटे हाॅस्पीटल सुरू केले. जीवनातील कोणत्याही प्रसंगात हार न मानता आपले काम करत राहण्याची चिकाटी मला स्वस्थ बसू देत नाही. हे काम करताना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आणि या सगळ्यात माझ्या डॉक्टर पत्नीने मला मोलाची साथ दिली. डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, समाज आणि आरोग्य यांच्यातील दरी सांधणारी संस्था सुरू करायची असे ठरवले. त्याकाळी आपल्याकडे मानसशास्त्र ही मर्यादित संकल्पना होती. त्यामुळे समाजाच्या अनेक स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. एकाच वाटेने न जाता, समाज जसा अनेक वाटांनी पुढे जात असतो, त्याप्रमाणे मीही अनेक वाटांनी पुढे जात राहिलो. समाजात सौहार्दाचे पुल बांधणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. माझ्या शारिरीक व्यंगामुळे माझ्या शालेय जीवनात मी मैदानी खेळ खेळू शकलो नाही. अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या हातात असलेल्या गोष्टींच्या जोरावरही पुढे जाता येते, ही शिकवण आई-वडिलांनी दिली.