राजगुरुनगर : आम्ही बांधावर फिरून जनतेच्या समस्या, प्रश्न जाणतो. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. लोक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प म्हणून हे अभियान आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघात शिव संकल्प अभियानाचा प्रारंभ व कार्यकर्ता मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. ६) शिरूर लोकसभा मतदारसंघात राजगुरुनगर (ता. खेड) येथे करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी सभेला संबोधित केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष बेताल आरोप करून जनतेत संभ्रम निर्माण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परकीय गुंतवणुकीत राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. तुम्ही सत्तेत आल्यावर ही स्थिती तिसऱ्या क्रमांकावर गेली. आज महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उद्योग पळवल्याचे कांगावे खोटे आहेत.
खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेनेचे मिशन ४८ आहे, तसे माझे पण शिरूर मतदारसंघाचा विकास हे मिशन आहे. माझा मागील निवडणुकीत पराभव झाला, मात्र मी थांबलो नाही विकास करत राहिलो. मतदारसंघात पाच वर्षे वणवण फिरत आहे. पाच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाली. त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले. परंतु मी खासदारकी मिळवण्यासाठी आक्रोश करणार नाही, असे खासदार अमोल कोल्हे यांचे नाव न घेता टीका केली.
पुणे - नाशिक रेल्वे, कळमोडी प्रकल्पात लक्ष घाला
धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी ४०० कोटींचा आराखडा मंजूर केला, त्याचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते फोडावा, अशी शंभू भक्तांची मागणी आहे. पुणे - नाशिक रेल्वे मार्गाच्या कामात प्रगती नाही, त्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. कळमोडी प्रकल्प योजनेत लक्ष घालावे. भामा - आसखेड प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा. भात पिकाला अर्थसहाय्य व चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे आपल्या भाषणातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी मागणी केली.