पुणे: आयटी धोरण अंमलबजावणी केल्याने आयटी क्षेत्रातही नवीन गुंतवणूक वाढलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. मात्र, आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आणले असल्याचे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही कॅबिनेट सबकमिटी झाली नव्हती. मात्र, आता एका वर्षात तीन वेळा सबकमिटी बैठक झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांशी संबंधित गुंतवणुकीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. मागील बैठकीत ४५ हजार कोटींच्या, तर कालच्या बैठकीत ३९ हजार ९०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबईतील झवेरी बाजार हा नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात येत असून, त्या ठिकाणी २१ एकरची जागा त्यांना देण्यात आली आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होणारा असून १ लाख रोजगार निर्मिती आगामी काळात होईल.
दावोसमध्ये एक कोटी ३७ लाख रुपयांचे करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले आणि त्यापैकी ८६ हजार कोटींच्या प्रकल्पांना राज्यात जमीन दिली गेली आहे. तसेच आतापर्यंत एसटी महामंडळाने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या माध्यमातून वर्षभरात मोफत प्रवास केला आहे. तर १४ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करण्याचा फायदा घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.