घोडेगाव : पुणे-नाशिक महामार्गाच्या बायपासला आमचा विरोध आहे सरळ रस्त्याला नाही, अशी भूमिका आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली, तर बाह्यवळण रद्द करणे आमच्या पातळीवर होणार नाही, ठरल्याप्रमाणे मोजणी होईल याला कोणी विरोध करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, अशी भूमिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.घोडेगाव येथे तहसील कचेरीत आंबेगाव तालुक्यातून गेलेल्या महामार्गाच्या भूसंपादनाबाबत महसूल अधिकारी, शेतकरी व रस्ता तयार करीत असलेल्या केएसईएल या कंपनीचे अधिकारी यांची बैठक झाली. या वेळी शेतकऱ्यांनी बाह्यवळणास कडाडून विरोध केला. रस्ता करण्यासाठी जागामालकांनी वेगवेगळे अनेक बदल सुचवले. या बदलांप्रमाणे रस्ता करा व शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, अशी भूमिका मांडली. या वेळी उपजिल्हाधिकारी संजय पाटील, प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे, डी. एस. झोडगे, बी. जी. गोरे, एमएसईएल कंपनीचे व्यवस्थापक एस. पी. सिंग, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे आदी अधिकारी व एकलहरेचे सरपंच संतोष डोके, डॉ. सुहास कहडणे, आशीष काळजे, धीरज समदडिया, अॅड. मुकुंद काळे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका लोकांना समजावी, यासाठी ही बैठक लावण्यात आली आहे. बाह्यवळण रद्द करणे आमच्या पातळीवर होणार नाही. ठरल्याप्रमाणे मोजणी होईल याला कोणी विरोध करू नका. बाह्यवळण रद्दरण्यासाठी वरच्या पातळीवर शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागतील. आम्ही काहीही करू शकत नाही, असे संजय पाटील यांनी सांगितले.याबाबत बोलताना जागामालक डॉ. सुहास कहडणे म्हणाले, की आमचा विरोध रस्त्याला नाही तर बाहयवळणाला आहे. बाहयवळणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे विचारात घेऊन रस्ता केला जावा. तसेच आज बोलावलेली बैठक अधिकृत नसून याच्या नोटिसा जमीनमालकांना पाठविलेल्या नाहीत. फक्त कळंब गावातील फळ््यावर याची सूचना लिहिलेली होती. प्रशासन जमीनमालकांबरोबर घेतलेली बैठक दाखवून आमच्यावर निर्णय लादू पाहत आहे. आमचा जमिनी देण्यास विरोध असून आमच्या जमिनीची मोजणी करू नये, असे झाल्यास आम्ही मोजणीला विरोध करू, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)
बायपासला आमचा विरोध आहे, सरळ रस्त्याला नाही!
By admin | Published: June 27, 2015 3:33 AM