रहाटणी : कोल्हापुरात मिनी बस नदीवरील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात बालेवाडीतील केदारी कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट व चालक असे १३ जण दगावले. त्यातून तीन जण बचावले असून, अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेला २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले. जखमींच्या भळभळत्या जखमा भरून आल्या असल्या, तरी मनावरील आघात अद्यापही कायम आहे. अपघातातून आम्ही वाचलो, पण जिवाभावाची माणसे गेली, हे शल्य मनाला बोचते आहे.पर्यटनासाठी कोकणात गेलेले केदारी, वरखडे व नांगरे कुटुंबीय २६ जानेवारीच्या रात्री कोल्हापूरला मुक्कामी निघाले. बसमध्ये चालकासह एकूण १६ जण होते. कोल्हापूरला जात असताना, त्यांची गाडी पंचगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. त्यातील १३ जणांचा अंत झाला.प्राजक्ता दिनेश नांगरे (वय १८), मनीषा संतोष वरखडे (वय ३८), मंदा भरत केदारी (वय ५४) या तिघी सुदैवाने या अपघातातून बचावल्या. जवळच्या, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींचा डोळ्यांसमोर मृत्यू झाला. या दु:खातून त्या अद्याप सावरल्या नाहीत. गौरी वरखडे (वय १६), ज्ञानेश्वरी वरखडे (वय १४), संतोष वरखडे (वय ४५), साहिल केदारी (वय १४), नीलम केदारी (वय २८), भावना केदारी (वय ३५), सचिन केदारी (वय ३४), संस्कृती केदारी (वय ८),श्रावणी केदारी (वय ११), सानिध्य केदारी (१० महिने), प्रतीक नांगरे (वय १४), छाया नांगरे (वय ४१) यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबीयांच्या वारसांवर दु:खाचा डोंगर कोसळला. एकाच दिवशी निघालेल्या अंत्ययात्रेचे बालेवाडीतील हे दृश्य मन हेलावणारे होते. केवळ कुटुंबीयच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या स्मृतिपटलावरून ही घटना अद्याप दूर झालेली नाही.> अपघातात मुलगी छाया नांगरे, जावई संतोष वरखेडे, मुलगा सचिन केदारी, सून नीलम केदारी, भावना केदारी यासह गौरी वरखेडे, ज्ञानेश्वरी वरखेडे, श्रावणी केदारी, संस्कृती केदारी, साहिल केदारी, प्रतीक नांगरे व सानिध्य केदारी यांच्यावर काळाने घाला घातला. घटनेनंतर अनेक राजकीय व्यक्तींनी भेट घेऊन सांत्वन केले. आर्थिक मदतीचे आश्वासन देणाºया शासनाकडून अद्याप काहीच मदत मिळाली नाही.- भरत सदाशिव केदारी>पर्यटनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा एकत्रित येत असतो. अशाच प्रकारे गतवर्षी कोकण पर्यटनासाठी एकत्र जमलो. मिनी बस करून २६ जानेवारीच्या पहाटे गणपती पुळेला गेलो. तेथून रात्री जेवण करून कोल्हापूरकडे रवाना झालो. रात्री ११च्या सुमारास पंचगंगेच्या पुलावरून बस खाली कोसळली. अचानक ही दुर्घटना घडली. बेशुद्धावस्थेत रुग्णालयात होते.शुद्धीवर आले होते; परंतु दु:ख सहन करण्याची शक्ती उरली नव्हती. - मनीषा संतोष वरखडे
आम्ही वाचलो, पण आमची जिवाभावाची माणसं गेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:44 AM