बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मागील गळीत हंगामाच्या काळात तत्कालीन अध्यक्षांनी आणि संचालक मंडळाने अगदी ३३०० रुपये दराने मागणी आली, तरीदेखील साखरविक्रीचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या काळातील थकीत देणी देण्यासाठी कर्जाचे हप्ते, व्याज, तसेच यंदाच्या गळीत हंगामासाठी मिळेल त्या दराने साखरविक्री करावी लागली. त्यातून त्यांच्या काळातील देणी भागवली. त्यामुळेच एफआरपीपेक्षा जादा आगाऊ हप्ता देणारा कारखाना म्हणून ‘माळेगाव’ची ओळख झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. माळेगावच्या संचालक मंडळाने कमी दराने विक्री केल्याने कारखान्याचे नुकसान झाले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. याशिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने कारखान्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. या अनुषंगाने सत्ताधारी संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेतली. या वेळी उपाध्यक्ष रामदास आटोळे, सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. १९ एप्रिल २०१५ पासून आम्ही सत्तेवर आलो. तेव्हापासून काही धाडसी निर्णय घेऊन ९९ कोटी ६९ लाख ५७ हजार रुपये उभे केले. त्यातून स खरेदी, गेटकेनवाल्यांची देणी भागवणे, त्यांच्या मुदत ठेव, त्यावरील व्याज, २०१३ /१४ च्या काळातील ऊस अनुदान खरेदी, व्यापाऱ्यांची देणी, बडोदा बॅँकेचे कर्ज व्याजासह परत करणे, आयसीआयसी बॅँकेचे तोडणी वाहतूक कर्ज व्याजासह परत करणे, तोडणी वाहतुकीचे थकीत देणी, कमिशन, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा हप्ता, व्याज, एसएमपीचा हप्ता, कामगारांचे २०१३ /१४ चे बोनस, रिटेन्शन, पगार असा खर्च करून २ कोटी १७ लाख रुपये शिल्लक ठेवले. बाळासाहेब तावरे अध्यक्ष असतानाची देणी आम्ही सत्तेवर असताना भागवली. त्याचबरोबर हंगाम सुरू असतानाच त्या वेळी साखरविक्री करण्याची निर्णय त्यांच्या काळात घेतला नाही. त्यामुळे १० लाख ७६ हजार साखर पोती पडून होती. त्या वेळी छत्रपती, सोमेश्वर कारखान्याने हंगाम सुरू असतानाच साखरेची विक्री केली. त्यामुळे त्यांची कमी साखर शिल्लक राहिली. माळेगावच्या तत्कालीन मंडळाला मुख्य लेखाधिकाऱ्यांनी साखरेचे दर कोसळत असताना टप्प्या टप्प्याने साखर विक्रीचा निर्णय घ्या, असे लेखी पत्र दिले होते. त्या वेळीच्या विरोधी संचालकांसह सर्वांनी त्याला संमती दिली होती. तरीदेखील साखरविक्री केली नाही. इथेनॉलची निर्मिती केली नाही. विक्री केली नाही. त्यामुळे कारखान्याची देणी वाढत राहिली. त्यांच्या काळातील देणी आम्हाली देणे भाग पडले. त्यामुळे जवळपास सव्वा लाख पोती साखर शिल्लक ठेवून ९ लाख ४३ हजार पोती साखरेची विक्री करावी लागली. त्याचप्रमाणे सोमेश्वर, छत्रपतीने साखर विक्री केली आहे. त्याच आमचे काय चुकले, असे चंद्रराव तावरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संचालक मंडळाची देणी आम्ही फेडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2015 12:38 AM