पुणे : २०२५ हे वर्ष नव्या सुधारणांसह बदलांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे. आपला देश शांतताप्रिय आहे. शांतता ही आमची कमजोरी नसून ताकद आहे. आम्ही युद्धाऐवजी बुद्धांना मानतो, असे मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पुण्यात व्यक्त केले. लष्कराच्या ७७व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बाॅम्बे सॅपर्स संस्थेच्या मैदानावर आयोजित गौरव गाथा कार्यक्रमात ते बोलत होते.
भविष्यात युद्धतंत्र बदलणार आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला विविध क्षेत्रांतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, सातत्याने स्वतःला सक्षम ठेवून येणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी तत्पर राहावे लागणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने २१ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, तसेच गेल्या दहा वर्षांत लष्करासाठी १ लाख २७ हजार कोटी रुपयांची भारतीय बनावटीची लष्करी उपकरणे तयार केली आहेत, असेही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.
समारोप प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, सदर्न कमांडचे ले.जनरल धीरज सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील सैन्यदलातील अधिकारी, कर्मचारी, तसेच शहीद झालेल्या सैनिकांचे वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी उपस्थित होते. यावेळी त्यांना वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.
संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते ‘शौर्यगाथा’चे उद्घाटन
महाराष्ट्राची वीरभूमी असलेल्या पुणे शहरात मी आज आलो आहे. या राज्याने देशाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, राणी ताराबाई, लोकमान्य टिळक यांसारखे योद्धे दिले. या पुण्यभूमीला मी वंदन करतो, असे उद्गारही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. सैनिकांची गौरव गाथा प्रत्येक भारतीय दररोज स्मरण करतो, दररोज सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आपले सैन्य देशाबाहेरील आव्हाने परतवून लावण्यास समर्थ आहेतच, त्याशिवाय देशांतर्गत आव्हानांना सामोरे जाण्यासाठीही सैनिकांचे मोठे योगदान आहे. विशेषत: भूकंप, महापूर, त्सुनामी आणि आपत्कालीन परिस्थितीतही सैनिक सदैव तत्पर असतात. या सर्व बाबी लक्षात घेत, २०४७ पर्यंत भारताला विकसनशील राष्ट्राकडून विकसित राष्ट्राकडे नेण्याचे लक्ष्य आहे. त्याची तयारी यंदाच्या वर्षापासून सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्मी पॅरा-ऑलिम्पिक नोडचे उद्घाटन...
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी आर्मी पॅरा-ऑलिम्पिक नोडचे ऑनलाइन भूमिपूजन केले. हे सेंटर पुण्यातील दिघी येथे स्थापित होणार आहे. या व्यतिरिक्त त्यांनी ‘भारत रणभूमी दर्शन ॲप’चे लाँचिंग आणि विशेष दिवसाच्या कव्हरसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२व्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ पदक जारी केले.
विविध युद्ध कलांचे सादरीकरण...
मार्शल आर्ट्स, युद्धाचे प्रात्यक्षिक, प्राचीन युद्धाची धोरणे, युद्धाची उत्क्रांती, समर्थ भारत सक्षम सेना या अंतर्गत विविध युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले.