पुण्यातील हे कलावंत आहेत आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे हरहुन्नरी शिलेदार.
‘आम्ही एकपात्री’ महाराष्ट्र ही संस्था बुधवारी (दि. २१) दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. याचे औचित्य साधून विख्यात गायक कै. छोटा गंधर्व यांच्या कन्या आणि ज्येष्ठ गायिका सुलभा सौदागर गोरे यांना मंगळवारी आर्थिक मदत दिली. आम्ही एकपात्री महाराष्ट्रचे संस्थापक विश्वस्त वंदन राम नगरकर, अध्यक्ष मारुती यादव, उपाध्यक्षा अनुपमा खरे, सदस्य बाळकृष्ण नेहरकर आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सुलभा गोरे यांना आर्थिक साहाय्य केले.
सुलभा गोरे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत शासनदरबारी, प्रसिद्ध कलाकारांसमोर समस्या मांडूनही त्याचा काही उपयोग झाला नाही. कुणीही मदतीचा हात दिला नाही. मीच नव्हे तर माझ्यासारखे अनेक कलावंत मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही एकपात्री महाराष्ट्रच्या कलाकारांनी मदतीचा हात देऊन मोठे सहकार्य केले आहे. या वेळी सुलभा गोरे यांनी कार्यक्रमाचा समारोप संगीत देवमाणूस या नाटकातील एक पद सादर करून केला.
सुनील महाजन म्हणाले, तीस-चाळीस वर्षांपासून सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक कलावंत, कार्यकर्त्यांचा सहवास लाभला. या कालावधीत अनेक कलावंतांनी आपल्याकडे अनेक अडचणी मांडल्या. त्या शासनदरबारी मांडून सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. कलाकारांनीच कलाकारांना मदतीचा हात देणे हा उपक्रम स्तुत्य आहे. सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने कलाकारांसाठी ठोस पावले उचलण्याचा मानस आहे.
वंदन राम नगरकर प्रास्ताविकात म्हणाले, संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याऐवजी वृद्ध आणि गरजू कलाकारांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.