--
लेखाचा लीड
--
डॉक्टरांनी रुग्णांमध्ये विठ्ठल पाहून काम केले पाहिजे, मेडिकल प्रॅक्टिस करताना ‘डू नो हार्म’ अर्थात कोणत्याही रुग्णाला कसलाच त्रास होऊ नये, यासाठी डॉक्टरांनी काम केले पाहिजे. हेच सूत्र साईश्री रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी कटाक्षाने पाळले आणि त्यामुळेच आम्ही हजारो रुग्णांची सेवा उत्तमपणे करू शकलो.
---
जॉईंट रिप्लेसमेंट आणि अर्थोपेडिक स्पोर्ट्स सर्जरी या क्षेत्रातील पुण्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रात एक नावलौकिक हॉस्पिटल म्हणून साईश्री हॉस्पिटलचे नाव आहे. त्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे, येथील डॉक्टर आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांची रुग्णांप्रति असलेली श्रद्धा. त्यामुळे आज दररोज राज्यभरातून अनेक रुग्ण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात येतात. अगदी छोट्या मुलांपासून ते शंभरी ओलांडलेल्या तीस हजारांहून अधिक रुग्णांच्या हाडांच्या आणि सांधेप्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आम्ही केल्या. या शस्त्रक्रिया इतक्या यशस्वी झाल्या की, ज्या रुग्णांना सांधेदुखीमुळे उठून उभे राहता येणे शक्य नव्हते, ते रुग्ण वणीचा गड चढून आले. मुंबईतील १०० वर्षांच्या आजींच्या गुडघ्यांची शस्त्रक्रिया इतकी व्यवस्थित झाली की, त्या आज ठणठणीत चालत आहेत. नुकताच त्यांचा १०४ वा वाढदिवस आम्ही साजरा केला. तर, आणखी एका रुग्णाची दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया आम्ही केल्यानंतर, त्या रुग्णाने नुकतीच नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली आहे. रुग्णांचा हा आत्मविश्वास आणि निरोगी आयुष्य पाहून आपण वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कामाचा मनस्वी आनंद होतो.
वास्तविक माझ्या कुटुंबातील माझ्या आधीच्या पिढीत कोणीच डॉक्टर नाही, माझे वडील इंजिनियर, तर आई गृहिणी आहे. आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती डॉक्टर असावी, अशी आजोबांची व वडलांची इच्छा होती. शिवाय, मलाही वैद्यकीय क्षेत्राची आवड होती, त्यामुळे मी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी केईएम हाॅस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. त्याच वेळी वैद्यकीय क्षेत्रातील जॉईंट रिप्लेसमेंट ही शाखा नव्यानेच उदयास आलेली होती व त्या क्षेत्रात डॉक्टरांची संख्या खूप कमी होती. शिवाय, रुग्णांना अतिशय त्रासदायक हा आजार होता, ज्यामुळे रुग्ण जागेवर उभे राहू शकत नाहीत. मात्र, त्यांच्यावर सर्जरी झाल्यानंतर ते रुग्ण उभे राहण्याबरोबर चालायला शिकतात व धावायला शिकतात इतके उत्तम उपचार या क्षेत्रात होत असल्याने मी जॉईंट रिप्लेसमेंट क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि अहमदाबादेतील शाल्बीमध्ये प्रवेश घेतला, तर स्पोर्ट्स मेडिसिनसाठी स्पेन देशातील फियाक सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले आणि कॉम्प्युटर जॉईंट रिप्लेसमेंटसाठी मेलबर्न येथे प्रशिक्षण घेतले.
साईश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर घेतले. त्या माध्यमातून हजारो रुग्णांची अत्यंत माफक दरात शस्त्रक्रिया केली. कोविडच्या काळातसुद्धा आम्ही आर्थोपेडिक रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी आमची ओपीडी कायम सुरू ठेवली व त्यांच्या उपचारांकडे दुर्लक्ष केले नाही.
--
चौकट
भारतामध्ये वैद्यकीय धोरणात आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. वाड्या-वस्त्यांवर हेल्थकेअर सेंटरची संख्या वाढली पाहिजे, सरकारी रुग्णालयांची संख्या व बेडची संख्या वाढली पाहिजे तर आणि तरच खासगी रुग्णालयांवर येणारा ताण कमी होईल व रुग्णांना वेळवर व मोफत उपचार मिळू शकतील. खासगी रुग्णालय किंवा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत चालणाऱ्या रुग्णालयांच्या करप्रणालीत सवलती द्यायला हवी. व्यावसायिक कर लावू नयेत त्यामुळे चॅरिटी करण्याकडे डॉक्टरांचा कल वाढेल.
--
Lokmat