उरुळी कांचन हे गांव शिंदे सरकारचे वतन असल्याने गावाला विकासकामे करताना जागेचा प्रश्न सतत भेडसावत असतो. तो सोडविण्यासाठी आज तरुण पदाधिकारी व ज्येष्ठ यांची एक बैठक ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केली होती. यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन, सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, अमित कांचन, मयूर कांचन, सुनील तांबे, शंकर बडेकर, माजी सरपंच दत्तात्रय कांचन आदी उपस्थित होते.
उरुळी कांचन गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी या ज्येष्ठ मंडळींच्या अखत्यारीत असलेल्या देवस्थान कमिटीच्या वतीने सीता ईनामाची सुमारे सात एकर जागा यापूर्वीच ग्रामपंचायतीला ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. नव्याने कचरा निर्मूलन, ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी, बायफ व निसर्गोपचार आश्रम ट्रस्टच्या विश्वस्तांशी संपर्क करून, तसेच महावितरणच्या कार्यालयासाठी जागा भाडेकराराने देण्याबाबत उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या विस्तारासाठी लागणारी जागा आदी कामांना चालना देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन या मंडळींना दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.