पुणे : राज्यकर्त्यांनी लाेकांचा धर्म पाहायचा नसताे. हिंदु-मुसलमान असा भेद करून राज्य करायचे नसते, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी येथे केले. सद्य:स्थितीवरही भाष्य केले.
डॉ. केदार फाळके लिखित ‘शिवछत्रपतींचा वारसा स्वराज्य ते साम्राज्य’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले. श्री शिवाजी मेमोरियल कमिटी श्रीशैलम यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, श्री शिवाजी मेमोरियल समितीचे कार्याध्यक्ष सुब्बा रेड्डी, उदय खर्डेकर, रघुराजे आंग्रे आदी उपस्थित होते.
हिंदुस्थानवर झालेले अरबी आक्रमण राक्षसी व रानटी होते. इस्लामच्या आक्रमणाचे स्वरूप वेगळे हाेते. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. मंदिरे तोडून मानसिक खच्चीकरण करण्याचा हेतू छत्रपतींनी हेरला. त्याविराेधात संघटित शक्ती उभी करून स्वराज्य उभे केले. यामुळेच महाराष्ट्र टिकला. छत्रपतींच्या कार्याचे स्मरण पुढील पिढीमध्ये हाेते ताेपर्यंत हिंदूंचं साम्राज्य वाढत राहिलं. भागवत म्हणाले की, इस्लामी आक्रमणाविरोधात कसे प्रयत्न करायला हवेत याचा विचार अनेक वर्षे सुरू होता. भारत टिकणार की नाही याचे उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानेे मिळाले. त्यांचा आदर्श त्रिकालाबाधित आहे. तो लढा स्वदेशी विरुद्ध विदेशी होता, असेही त्यांनी नमूद केले.
हिंदुस्थानवरील आक्रमण फार पूर्वी सुरू झाले. जेवढं लुटता येईल तेवढं लुटलं. नंतर इस्लामी आक्रमण झालं. हे आक्रमण वेगळं हाेतं. हे समजायला वेळ लागला. इस्लाम आक्रमकांनी परंपरा, धर्म माेडायला लावला. त्याचा प्रतिकार करीत यशस्वी झालेला पहिला लढा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याच्यातून अटकेपार झेंडे फडकवण्याची प्रेरणा पुढे मिळाली.
शिवाजी महाराजांनी दिलेली ध्येयनिष्ठता अटकेपार झेंडे फडकवण्यापर्यंत होती. मराठ्यांचे सैन्य हिंदू म्हणून लढले नाही. आजही तीच लढाई आहे. असुरांशी लढाई आहे आणि याचे केंद्रही भारतच आहे. भेद न करता सर्वांना एकत्र उभे राहावे लागेल, असेही भागवत यांनी सांगितले.