'सत्ताधाऱ्यांसोबत बसून दंगली घडविण्याचा डाव आम्ही उधळला'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 11:57 AM2020-01-01T11:57:34+5:302020-01-01T11:58:20+5:30
भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष
पुणे - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर, तेथे जमलेल्या विविध संघटनांशी वार्तालाप केला. याठिकाणी आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभाही घेतली जाणार असून सर्वच अनुयायांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मात्र, विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पोलिसांनी दक्षता घेतली आहे, काही जणांवर ते नजर ठेऊनही आहेत. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नसल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. मात्र, मराठवाडा विद्यापीठ नामांतरावेळी राजकीय परिस्थिती बदलल्याने लोकांनी राजकीय दंगल घडवली. सध्याही राज्यात सत्तांतर झाले असून त्याचा फायदा घेऊन कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता. पण, आम्ही सत्ताधाऱ्यांसोबत बसून हा डाव उधळून लावल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला आहे.
भीमाकाठावरील कोरेगाव भीमानजीक ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी विविध पक्ष, संघटना आणि मान्यवरांसह महाराष्ट्रासह विविध राज्यांतून 1 जानेवारीला पुण्यात भीमसागर लोटला आहे. विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी सुमारे 10 हजार पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शूरवीरांची आठवण ठेवण्यासाठी, त्यांना वंदन करण्यासाठी सर्वांनी इथं यावं. तसेच, कुणी काहीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कुणीही विश्वास ठेऊ नये, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी 1 जानेवारी 1818 रोजी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात लढाई झाली. यात महार बटालियनच्या 500 सैनिकांनी पेशव्यांच्या 28 हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. त्यात महार रेजिमेंटच्या अनेक सैनिकांना वीरमरण आले. या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी 1822 मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमा नदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. 1927 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव 1 जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे येऊ लागले.