प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : निद्रानाश, पुरेशी झोप मिळत होत नसल्याने होणाऱ्या समस्या पूर्वी रात्रपाळी करणाऱ्यांपर्यंतच होत्या, पण आता फेसबुकपासून इन्स्टापर्यंत फिरत राहणाऱ्यांना, दर सेकंदाला व्हॉॅट्सॲप पाहणाऱ्यांना आणि रात्र-रात्र जागून वेबसीरिज संपविणाऱ्यांनाही विकारांनी घेरले आहे.
दरवर्षी मार्च महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी वर्ल्ड स्लीप डे म्हणजे ‘जागतिक निद्रा दिन’ साजरा केला जातो. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे, हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने लोकांच्या झोपेच्या सवयींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोरोनानंतर झोपेची समस्या झाली गंभीर
कोरोना काळात आणि कोरोनानंतर तर ही समस्या आणखी गंभीर झाली. आयुष्यातील अनपेक्षित बदल, बेरोजगारी, अनिश्चितता, भीती, अस्थैर्य, निराशा यामुळे निद्रानाशाच्या प्रमाणात वाढ झाली.
काय सांगतोय सर्व्हे
भारतात करण्यात आलेल्या ‘इंडिया स्लीप सर्व्हे’ २०२१च्या आकडेवारीनुसार कोरोना काळात
३७ टक्के लोकांमध्ये झोप लागत नाही
२७ टक्के लोकांची झोप पूर्ण होत नाही
३९ टक्के लोकांमध्ये रात्री अचानक जाग येते
५२ टक्के लोकांमध्ये झोपेत असताना श्वसनक्रियेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
‘मी कोंढापुरी येथील कंपनीत कामगार म्हणून काम करतो, गेल्या ३ वर्षांपासून मी रात्रपाळी करत आहे. रात्रीच्या वेळी झोपेला आवर घालून काळजीपूर्वक काम करावे लागते. त्यामुळे मी दिवसभरात घरची कामे उरकून उरलेल्या वेळेत झोपतो असे कंपनी कामगार एकनाथ गायकवाड यांनी सांगितले.'
‘शिक्षण पूर्ण झाल्याने पूर्ण वेळ घरीच असते. त्यामुळे पूर्ण वेळ स्क्रीनसमोरच जातो. रात्री १-२ वाजेपर्यंत मी मोबाइलवर सीरिज पाहत असल्याचे तरुणी सलोनी चंडेश्वरा म्हणाली आहे.'
‘मी इन्स्टाग्राम अडिक्ट आहे. रिल्स पाहणे, सोशल मीडियावर सर्फिंग करणे यामुळे रात्री झोपायला २-३ वाजतात. वेबसीरिज पाहायची खूप सवय लागली असल्याने लवकर झोपच येत नसल्याचे शुभम माने या तरुणाने सांगितले आहे.'