विधीमंडळ अधिवेशनात झालेल्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी भाजपच्या आमदारमाधुरी मिसाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अधिवेशनात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. याच पत्रकार परिषदेत मिसाळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, 'आम्हाला वाटलं सरकार आमचंच येईल'.
याबाबत अधिक माहिती अशी की, 'मिसाळ यांनी शहराशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर माहिती दिली. या अधिवेशनात ७५ तारांकित प्रश्न आणि ६ लक्षवेधी सूचना उपस्थित केल्याचे सांगितले. भाजप सरकारने सुरु केलेल्या प्रकल्पांना गती देण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबईचा विकास सुरु असताना पुण्याला मात्र सावत्र वागणूक मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी त्यांना एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनायटेड डी सी रुल पॉलिसी) बाबतचा प्रश्न विचारण्यात आला. भाजपने ही पॉलिसी तयार केली होती तर त्यांच्या काळातच अंतिम का केली नाही असा सवाल माध्यमांनी केल्यावर त्यांनी प्रांजळपणे 'आम्हाला वाटलं आमचंच सरकार येईल' असे उत्तर दिले.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असताना राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आहे. भाजपने त्यानंतर आम्हाला कोणत्याही पक्षासोबत सत्ता स्थापन करण्यापेक्षा विरोधी पक्षात बसण्यातच अधिक स्वारस्य आहे असे वारंवार स्पष्ट केले आहे. मात्र पक्षातल्या अनेक नेत्यांसाठी अजूनही हा धक्काच असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.