पुणे: लोकसभा मतदारसंघासाठी पुण्यात आज, सोमवारी (दि. १३) मतदान होत असून, यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. या मतदारसंघात ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, तर महायुतीतर्फे भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात होत आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी लढतीत रंगत आणली असून, एमआयएमचे अनिस सुंडके हेदेखील रिंगणात आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.
पुण्यात अभिनेत्री श्रुती मराठे यांनी कटारिया हायस्कूल या ठिकाणी मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावला आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. गेले तीन ते चार वर्षे मी मतदान करीत आहे. आपण ही न चुकता मतदान हक्क बजावला पाहिजे हे आता पर्यंत पाच वेळा मी मतदान हक्क बजावला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पुणे मतदारसंघात एकूण २० लाख ६१ हजार २७६ मतदार आहे. यात १० लाख ५७ हजार ८७० पुरुष, तर १० लाख ३ हजार ८२ मतदार महिला आहेत, तसेच ३२४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.