पुणे : महाविद्यालयीन जीवनात पुरूषोत्तम करंडकमध्ये सहभागी झाल्याने खूप छान अनुभव आले. खूप शिकायला मिळाले. तेव्हा आम्ही प्रचंड मेहनत घेतली. मी पुरूषोत्तमसाठी दोन एकांकिका लिहिल्या होत्या. त्यातील एक अंतिम फेरीला गेली आणि दुसरी नाही गेली. पण दीड-दोन महिने एकांकिकेसाठी तालमी करताना आम्ही झपाटून गेलेलो असायचो. तालिम करताना वडापाव आणि चहा मिळायचा, जर एक्स्ट्रा चहा आला, तर तो आनंद दिवाळीसारखा असायचा, अशा भावना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.
पुरूषोत्तम करंकडमध्ये विद्यार्थी असताना त्यांनी एकांकिका लिहावी अशी अपेक्षा आयोजकांची असते. विषय, आशय, लेखन, अभिनय, नेपथ्य असे सर्व काम विद्यार्थ्यांना एकांकिका करता यावे, हाच उद्देश त्यामागे असतो. त्यानूसार पूर्वी विद्यार्थी असताना लेखन केलेले अनेकजण आज नामांकित तारे बनले आहेत. त्यामध्ये सोनाली कुलकर्णी यांचाही समावेश आहे. तसेच अतुल पेठे, अभिराम भडकमकर, प्रवीण तरडे, विभावरी देशपांडे, योगेश सोमण यांचाही समावेश करता येईल.
सोनाली कुलकर्णी पुरूषोत्तमच्या आठवणी सांगताना म्हणाल्या,‘‘मी मंजू आणि आम्ही निष्पाप या दोन एकांकिका लिहिल्या होत्या. त्यासाठी फर्ग्युसनमधील प्राध्यापक व प्राचार्यांनी खूप प्रोत्साहन दिले होते. पुरूषोत्तम करंडक म्हटलं की, आम्हाला खूप उत्साह यायचा. तालिम करताना स्वत:चे पैसे देखील खर्च करायचो. एकांकिका बसवताना महाविद्यालय देखील मदत करत असते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या पैशांचा सर्व हिशेब आम्ही त्यांना द्यायचो. दोन रूपये खर्च आला तरी लिहून ठेवायचो. कॉस्च्युम जमवताना मजा यायची. तालिम करताना सर्वकाही विसरून जायचो.’’
तो क्षण आजही खूप आनंद देऊन जातो
एकांकिकेची तालिम करताना तहानभूक विसरून आम्ही काम करायचो. तेव्हा दिवसभर वडापाव आणि चहा यावरच असायचो. त्यात खूप आनंद मिळायचा. नेहमीपेक्षा एक्स्ट्रा चहा मिळाला, तर आम्हाला भारी वाटायचे. दिवाळी साजरी झाल्यासारखं वाटे. आम्हाला एकांकिकेसाठी खूप बक्षीसे मिळाली. तेव्हा खुद्द प्राध्यापकांनी आम्हाला प्राचार्यांच्या केबिनमध्ये नेले आणि तिथे चहा दिला होता. तो क्षण आजही खूप आनंद देऊन जातो. अविस्मरणीय असा तो प्रसंग होता. - सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री