पुणे : आत्तापर्यंत मी खूप सहन केलयं... आमच्यात पूर्वीच प्रेम राहिलं नाही... त्यामुळे आता आमचं आता पक्क ठरलयं... काहीही झालं तरी एकत्र राहणार नाही... आम्ही घटस्फोट घेणारच. अशा मतापर्यंत पोहचलेल्या दाम्पत्यांना कौटुंबिक न्यायालयात नुकतेच सुरू करण्यात आलेल्या लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत.वाद टोकाला गेला की जोडप्यात पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अनेक प्रकरणात ही जोडपी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात. असे प्रकार कमी व्हावेत आणि दावा दाखल करण्यापुर्वीच त्यांना समुपदेश करावे व त्यांचे सुर पुन्हा जुळावे म्हणून कौटुंबिक न्यायालयात लेस्ट् टॉक (चला बोलुया) नावाचे सेंटर आॅगस्टमध्ये सुरू करण्यात आला आहे. उपक्रम सुरू झाल्यापासून गेल्या दोन महिन्यात सेंटरमध्ये सुमारे २० प्रकरणे दावा दाखल करण्यापुर्वीच समुपदेशनातून मिटविण्यात आले आहेत. मात्र समुपदेशातून सुटलेले आणि मार्गदर्शन घेण्यासाठी आलेल्यांमधील अनेक दाम्पत्ये ही घटस्फोट घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले आहे. दावा चालवून घटस्फोट घेत असताना वाद होणार असतील तर आम्ही संमतीने वेगळे होवू, असा मार्ग स्विकारत ही जोडपी विभक्त होत आहेत. महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाकडून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुंबईत बांद्रा कौटुंबिक न्यायालयात प्रथम अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर पुण्यात सुरू करण्यात आलेले हे दुसरे केंद्र आहे. कौटुंबिक स्वरुपाच्या दाव्यांत तक्रारदारांना दाखलपूर्व मार्गदर्शन मिळावे हा या केंद्राचा उद्देश आहे. घटस्फोटाचा दावा, पोटगीबाबतचे वाद, मुले कोणाकडे राहणार, घटस्फोटानंतर पती किंवा पत्नी मुलांना कधी भेटणार, भेटण्यावरून झालेले वाद, पत्नीने नोकरी करायची की नाही तसेच आर्थिंक आणि मानसिक वाद सोडविण्याच्या दृष्टीने या केंद्रात मार्गदर्शन केले जाते. दाम्पत्याला समुपदेशन करण्यासाठी चार व्यक्तींचे पॅनल नियुक्त करण्यात आले आहे. जोडप्यातील वाद नेमका कोणत्या स्वरुपाचा आहे, त्यानुसार सल्ला दिला जातो. विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज केल्यानंतर संबंधित दाम्पत्याला वेळ आणि तारीख देवून केंद्रात पाठवले जाते. केंद्रात तक्रारदारांना समुपदेशकांबरोबर बोलता यावे म्हणून स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दाखलपूर्व दाव्यात समुपदेशन करण्याची ही सुविधा लोकांना फायदेशीर ठरणार आहे. थेट न्यायालयात दावा दाखल करण्यापूर्वी पक्षकारांना याठिकाणी मार्गदर्शन मिळते.वादापेक्षा चर्चा हवी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी हे केंद्र अतिशय फायदेशीर ठरत आहे.पक्षकारांना तज्ज्ञांकडून सल्ला देण्याचीही सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. समुपदेशनासाठी आलेल्यांपैकी अनेक दाम्पत्यांचे आधिच सर्व ठरलेल असले. तर काहींचे वाद याठिकाणी चर्चा करून मिटविण्यात येतात. वाद करून संबंध आणखी बिघटण्यापेक्षा चर्चा करू मार्ग काढावा, असे आवाहन दी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी केले.
आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय....!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 7:57 PM
लेस्ट् टॉकच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. मात्र, त्यातील अनेक जोडपी आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचंय याच भूमिकेवर ठाम असल्याचे धक्कादायक वास्तव पाहायला मिळत आहेत.
ठळक मुद्देलेस्ट् टॉकच्या माध्यमातून दाव्यापूर्वीच जोटप्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन दाम्पत्याला समुपदेशन करण्यासाठी चार व्यक्तींचे पॅनल नियुक्त