कुमार केतकर : अन्नपूर्णा परिवाराचा वर्धापनदिन संपन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “देशभरात आजवर झालेले संघर्ष, चळवळी लोकशाहीला पूरक होत्या. सध्याचा संघर्ष हा मोदीप्रणित फॅसिझम विरोधातला आहे. गेल्या सात-आठ वर्षांत मोदी-शहांनी प्रशासन, राजकारणावर कब्जा मिळवला. त्यामुळे राजकारणाचा पोतच बदलला आहे. आपल्याला देश फॅसिझममुक्त करून पुन्हा लोकशाही प्रस्थापित करायची आहे. त्यासाठी भाषिक चळवळी, समूहांनी एकत्र येऊन प्रशासकीय हक्कांसाठी लढले पाहिजे,” असे मत कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केले.
पुणे येथील अन्नपूर्णा परिवाराच्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केतकर बोलत होते. यावेळी परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक मेधा पुरव-सामंत, विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर, उज्ज्वला वाघोले तसेच अन्य विश्वस्त उपस्थित होते. यावेळी दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने प्राचार्य चंद्रकांत केळकर लिखित ‘जागतिक अर्थव्यवस्थेपुढील पेच’, डॉ. श्रीनिवास खांदेवाले लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ आणि कॉ. भालचंद्र कानगो लिखित ‘महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. अन्नपूर्णा परिवाराच्या ‘संवाद’ या त्रैमासिकाचे प्रकाशन यावेळी झाले. वृषाली मगदूम यांनी संपादक मंडळाच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रा. आनंद मेणसे लिखित ‘संघर्ष : महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी’ या पुस्तकाचेही प्रकाशनही झाले.
केतकर म्हणाले, “आताच्या पिढीमध्ये चळवळीबाबत तीव्रता जाणवत नाही. हुतात्म्यांबद्दल आस्था दिसत नाही. अपवाद वगळता संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल फारसे साहित्य उपलब्ध नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हा विषय प्रबंधासाठी घेतलेला नाही. माहितीचे स्रोत कमी झाल्याने पुढील पिढ्यांना फारशी माहिती मिळत नाही. चळवळींचा इतिहास लिहिला जाणे आवश्यक आहे.”
डॉ. मेणसे म्हणाले, “कर्नाटकातील मराठी माणसाचा संघर्ष तीन पिढ्यांपासून चालत आला आहे. आम्हाला महाराष्ट्रात विलीन करावे, एवढीच आमची मागणी आहे. हा लढा सनदशीर पद्धतीने, गांधीवादी मार्गाने आजवर पुढे आला. सध्या यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संघर्षाची पार्श्वभूमी पुढील पिढ्यांना समजणे आवश्यक आहे.” उज्ज्वला वाघोले यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त सुरेश धोपेश्वरकर यांनी आभार मानले.