पुणे : निवडणुका जवळ आल्याने राजकारण आता तापू लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील काेथरुड मतदारसंघामधून लढण्याचे जवळपास नक्की झाले आहे. तसे संकेत देखील पाटील यांनी दिले आहेत. अद्याप अधिकृत घाेषणा हाेणे बाकी आहे. असे असताना त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर हाेण्याआधीच त्यांना आता विराेध हाेऊ लागला आहे. ''दुरचा नकाे घरचा पाहिजे आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे'' असे लिहीलेले फ्लेक्स आता काेथरुडमध्ये विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत.
येत्या 21 ऑक्टाेबरला राज्यात निवडणूका हाेत आहेत. 24 ऑक्टाेबरला राज्यात काेणाची सत्ता येणार याचा निकाल लागणार आहे. भाजपाकडून अनेक विद्यमान उमेदवारांना उमेदवारी नाकारण्यात येण्याची शक्यता आहे. त्यातच पुण्यातील काेथरुड भागातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले असून त्याबाबतची अधिकृत घाेषणा हाेणे बाकी आहे. काेथरुडमध्ये ब्राह्मण समाजाच्या मतदारांची संख्या अधिक आहे. सध्या भाजपाच्या मेधा कुलकर्णी या येथील आमदार आहेत. पाटील यांची उमेदवारीची चर्चा सुरु हाेताच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून पाटील यांच्या उमेदवारीला विराेध करण्यात आला हाेता. 'पुणे शहरातील ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजपाच्या बरोबर राहिला आहे. असे असून सुद्धा कोल्हापूर येथील मंदिरातून ब्राह्मण समाजाला हाकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या, दादोजी कोंडदेव आणि गडकरी यांच्या पुतळ्यांना न्याय न देणाऱ्या अशी पुण्याबाहेरील ब्राह्मण द्वेष्टी व्यक्ती जर पुण्यातून उभी राहत असेल तर ब्राह्मण समाज त्याला विरोध करणार. जातीचे, आरक्षनाचं राजकारण करून खुल्या वर्गातील लोकांना सर्वच संधी नाकारणाऱ्या पक्षाबरोबर जायचे का नाही याचा विचार करावाच लागेल. गरज पडलीच तर उमेदवार सुद्धा उभे करू' असे ब्राह्मण महासंघाकडून सांगण्यात आले आहे.
आता काेथरुडमध्ये फ्लेक्स लावण्यात आले असून पाटील यांच्या उमेदवारीला विराेध दर्शविण्यात आला आहे. ''दूरचा नकाे घरचा पाहिजे आमचा आमदार काेथरुडचा पाहिजे - आम्ही काेथरुडकर '' असे लिहीलेले फ्लक्स काेथरुडमध्ये लावण्यात आले आहेत. काेथरुड भागातील कर्वे पुतळा तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घाेषणा हाेण्याआधीच त्यांना विराेध हाेण्यास सुरुवात झाली आहे.