पुणे: पुढील महिन्यापासून विधानसभेच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेला विजय मिळवल्यानंतर महाविकास आघाडीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, जागावाटप याबाबत बैठकाही सुरु आहेत. पुण्यातही विधानसभेला जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचे आघाडी नेत्यांच्या बोलण्यातून दिसू लागले आहे. पुण्यात शरद पवार गटाने शहरातील आठही जागा लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनीमहाविकास आघाडीच्या बैठकीत तीन मतदारसंघ मागितल्याचे सांगितले आहे.
वडगाव शेरी शिवसेनेचाच विधानसभा मतदारसंघ आहे, त्याशिवाय हडपसर व कोथरूड असे तीन मतदारसंघ आम्ही महाविकास आघाडीत शिवसेनेने (उद्धव ठाकरे) मागितले आहेत अशी माहिती पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. राज्यात आम्हाला बीड, माजलगाव, अमरावतीही पाहिजे आहे, मात्र आघाडीचे वरिष्ठ नेते याबाबत अंतीम निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या आहेत
मी शिवसेनेची पदाधिकारी आहे. पुणे माझाच जिल्हा आहे. वडगाव शेरीत मी रहायलाच आहे. माझे तिथे घर आहे. माझी स्वत:ची तिथे ६३ हजार मते आहेत, याचा अर्थ मी माझ्यासाठी म्हणून तो मतदारसंघ मागते आहे असा नाही. मला पक्षाने जिल्ह्यातील मतदारसंघांचा अहवाल मागितला होता. तो मी दिला. त्यात हडपसर, कोथरूड बरोबरच वडगाव शेरीची मागणी केली आहे असे अंधारे यांनी सांगितले.