पुणे : अभिनेता शाहरुख खानचा आगामी पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. भगवा रंग जसा भाजप, शिवसेनेचा आहे, तसाच तो आमचा पण रंग आहे. मात्र गाण्यातील बेशरम शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
पठाण या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. मात्र हे गाणं सुरुवातीपासूनच वादात सापडले असून या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. त्यामुळे वाद झाला असून गाण्याला विरोध होत आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बिकीनीला नव्हे तर गाण्यातील बेशरम शब्दावर आक्षेप घेतला आहे.
यावेळी आठवले यांनी भीमा-कोरेगाव येथील कार्यक्रमासंदर्भातही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, १ जानेवारीला भीमा कोरेगाव मध्ये लाखोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी येतात. दलितांच्या, महाराजांच्या शौऱ्याची आठवण तिथे आहे. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी याबद्दल मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं आठवले म्हणाले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेवर आठवले म्हणाले की, चंद्रकांत पाटील राज्यातील सिनियर नेते आहेत. मात्र त्यांच्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाहीय. त्यांनी भीक हा शब्दप्रयोग केला, त्यामुळे लोकांमध्ये रोष आहे. मात्र त्यांनी आता माफी मागितली आहे. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो की ३०७ मागे घ्या. आता ते मागे घेतले आहेत. हा विषय लांबावणे योग्य नाही. सर्वांनी शांती ठेवणे आवश्यक आहे, असंही आठवले यांनी म्हटलं.