आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 09:00 PM2019-10-12T21:00:53+5:302019-10-12T21:04:02+5:30
घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली.
पुणे: देशात व राज्यातही सलग ५ वर्षे काम करून नरेंद्र मोदी, देवेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळेच देशात पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आता महाराष्ट्रातही तेच होणार असून काँग्रेसने राज्यात कधीकाळी केलेला २२१ जागांचा विक्रम मोडू, असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
निवडणूक प्रचारासाठी म्हणून जावडेकर पुण्यात आले होते. खासदार गिरीश बापट यावेळी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली. राष्ट्रवादीची अवस्था वेगळी नाही. कोणत्याही विरोधी पक्षात ताकद नाही. मोजक्याच जागा लढवणारे विरोधी पक्षाची भूमिका मतदारांकडे मागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने देशात व महाराष्ट्रात ५ वर्षे काम केले. तेच जनतेच्या मनात आहे. काही डावे पक्ष भाजपाला पाशवी बहुमत मिळाले म्हणतात, मात्र हे लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले सरकार आहे. त्या लोकांच्या विश्वासाचा अपमान डावे पक्ष करत आहेत.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांना काँग्रसने पाठिंबा दिला. ३७० कलम रद्द केले तर राहूल गांधींना तिथे गोळीबार सुरू असल्याचे स्वप्न पडले. कलम रद्द केल्यापासून ७५ दिवसात तिथेही एकही गोळी झाडली गेली नाही. राहूल यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्ताननेघेतला. अशा राष्ट्रविरोधी भुमिकांमुळेच तो पक्ष दिवाळखोरीत गेला. अशा पक्षातील नेत्यांनाच भाजपाने प्रवेश दिला आहे याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, पक्ष भरकटला असे ज्या काही चांगल्या लोकांना वाटले तेच आमच्या पक्षात आले आहेत. राज्याच्या प्रचारात ३७० कलम रद्द केल्याचा मुद्दा कशासाठी यावर जावडेकर यांनी राष्ट्रवाद हा निवडणुकीतील मुद्दा असू नये का असा प्रतिप्रश्न केला. विकासाच्या कामांचाही मुद्दा प्रचारात आहेच असे ते म्हणाले.
रार्ष्टीय नागरिकत्वाचा मुद्दा (एनआरसी) काँग्रेसचाच होता, आता तो राबवला जातो आहे तर त्यावर टिका होते. जीएसटी लागू केला, त्यावेळी काँग्रेसचे तब्बल ७ माजी मंत्री त्याविषयीच्या समितीमध्ये होते. त्यांच्या सुचनांवरूच दर वगैरे ठरवण्यात आले. आता तेच विरोध करत आहेत. काश्मिरच्या मुद्द्यावर काँग्रेसने सभागृहात बाजूने मतदान केले व आता त्याविरोधात बोलत आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा जनतेच्या आता लक्षात आला आहे अशी टीका जावडेकरांनी केली. भाजपाचे उज्वल केसकर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, अॅड. मंदार जोशी, परशूराम वाडेकर, नगरसेवक महेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते.