पुणे :महायुतीतील सर्व पक्षांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली आहे. महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. अधिवेशन आणि आचारसंहिता यामध्ये दोन महिने जातील. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी धोरण आखले जात आहेत, असे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) देशभरात ४०० जागा मिळतील असे वातावरण होते. पण तसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर देशपातळीवर अनेक बदल होण्याचा अंदाज असल्याचेही ते म्हणाले.
सहकार विभागाच्या विविध बैठकांसाठी पुणे दौऱ्यावर आले असता सोमवारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘महायुतीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मिळून निर्णय घेतात. मी त्या धोरणात नसतो. तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील. अधिवेशन आणि आचारसंहिता यामध्ये दोन महिने जातील. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीसाठी धोरण आखले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी शरद पवारांना सहानुभूती मिळत आहे, हे माझे सामान्य वक्तव्य होते. मी कुठेही असलो तरी माझ्या वाट्याला येणारे काम मी प्रामाणिकपणे करतो. श्रेय आणि अपयश याचा विचार करीत नाही याकडेही वळसे पाटील यांनी लक्ष वेधले.