पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आघाडी केल्यानंतर काँग्रेसला समाधानकारक अनुभव मिळालेले नाहीत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकाधिक संधी मिळावी, याकरिता पक्षाची चांगली बांधणी करून आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले. गटबाजी दूर करून पक्षाला आलेली मरगळ झटकणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.काँग्रेस पक्षाच्या शहराध्यपदी निवड झाल्यानंतर रमेश बागवे यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले. नगरसेवक अविनाश बागवे, शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी, पक्षाचे पदाधिकारी रमेश अय्यर, नौशाद शहाणी, जुबेर दिल्लीवाले, रोहित अवचिते या वेळी उपस्थित होते.रमेश बागवे म्हणाले, ‘‘सुरेशभार्इंचा कार्यकर्त्यांना आधार होता, त्यांच्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली. विधानसभा निवडणुकीनंतर अभय छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात होते. आता शहराध्यक्ष म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. पक्षाला एकसंध ठेवून वाटचाल केली जाईल. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक एकत्र बसून चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतील.’’एमआयएमबद्दल बागवे म्हणाले, ‘‘एमआयएम हे भाजपाचेच पिल्लू आहे. नुकत्याच मुस्लिमबहुल कोंढवा भागात झालेल्या नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव केला. टीमवर्कमुळे हे यश मिळाले़ पालिका निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने यशस्वी सामना करू.’’गटबाजीमुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली, त्यामुळे गटबाजी दूर करण्यावर यापुढील काळात भर दिला जाणार आहे. दर आठवडयाला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, नगरसेवकांशीही नियमित संवाद साधला जाईल. मेट्रो, बीआरटी, कचरा असे अनेक प्रश्न रखडले आहेत. ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आंदोलन केले जाईल, असेही रमेश बागवे यांनी सांगितले़वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यातप्रभागात एकाच पक्षाचे नगरसेवक असले तरी त्यांच्यामध्ये मतभेद होतात. त्याचा परिणाम विकासकामांवर होतो. त्यामुळे वॉर्ड पद्धतच अधिक योग्य आहे. वॉर्ड पद्धतीने निवडणुका व्हाव्यात, ही काँग्रेस पक्षाची भूमिका असणार असल्याचे रमेश बागवे यांनी या वेळी स्पष्ट केले.
आम्ही स्वबळावर लढणार
By admin | Published: April 14, 2016 2:22 AM