चंदननगर (पुणे) : ‘मराठ्यांसाठी आरक्षण तर घेणारच आणि तेही ओबीसीमधूनच घेणार. आरक्षणाचा हा लढा शांततेत, संयमाने लढून जिंकायचा आहे. कसलीही हिंसक कृती न करता लढायचा आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर आपण वडगावशेरीत सभा घेऊ,’ असे प्रतिपादन मराठा आरक्षणाचे प्रणेते मनाेज जरांगे-पाटील यांनी केले.
मराठा आरक्षणासाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण माेर्चा मुंबईत धडकणार आहे. या माेर्चाला लाेकांचा माेठा प्रतिसाद मिळत असून, मंगळवारी (दि. २३) रात्री हा माेर्चा उशिरा खराडीतील चाेखीदाणी येथे दाखल झाला. मुक्कामानंतर या माेर्चाचे प्रस्थान बुधवारी (दि. २४) सकाळी १० वाजता खराडी येथून सुरू झाले. नगर रस्त्यावरून दर्गा येथे ही दिंडी दुपारी सव्वाबारा वाजता दाखल झाल्यावर तेथून वाहनाने खराडी बायपास चौकात मोठ्या हारांनी स्वागत करण्यात आले. तेथून दोन वाजता चंदननगर जुनी भाजी मंडई येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तेथून यात्रा विमाननगर चौकात तीन वाजता दाखल झाली. पुढे चार वाजता रामवाडी पाणीपुरवठा केंद्र येथे हा माेर्चा पाेहाेचला. याठिकाणी जरांगे-पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतल्याने काल रात्रीपासूनच नगर रस्त्यावरील अवजड वाहतूक वळविण्यात आली होती. सकाळी दहा वाजता निघालेली आरक्षण दिंडी दुपारी चार वाजता रामवाडी चौकात पोहोचली. जरांगे-पाटील यांनी दुपारचे जेवण चंदननगर ते विमाननगर प्रवासात गाडीच्या टपावर बसून केले. मोठी गर्दी झाल्याने तब्बल सात किमीसाठी तब्बल सहा तासांचा वेळ लागला.
संध्याकाळी ६ वाजेनंतर वाहतूक कोंडी फुटली...
जरांगे पाटील यांच्या यात्रेने नगर रस्ता तर बंद होताच, मात्र विमानतळ ते कल्याणीनगर कोरेगाव पार्क रस्ता मात्र तब्बल चार तास कोंडीत अडकला होता. विमानतळ ते कल्याणीनगर दरम्यानच्या कोंडीमुळे विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरीमधील अंतर्गत रस्ते कोंडीमुळे अडकले होते, ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांना संध्याकाळी ६ वाजले.
शाळांना सुट्टी द्यायला पाहिजे होती...
खराडी, चंदननगर, कल्याणीनगर, विमाननगर सर्वच भागातील शाळांना सुट्टी द्यायला हवी होती. जरांगे पाटलांच्या आरक्षण दिंडीने संपूर्ण नगर रस्ता वाहतूक बंद केली होती; मात्र शाळांच्या वाहनांना रस्त्यावरील गर्दीमुळे वाटच मिळत नसल्याने शालेय वाहतूक करणारी वाहने कोंडीत अडकली. प्रशासनाने शाळांना सुट्टीच द्यायला हवी होती, असे मत विविध शाळांतील मुलांचे पालकांकडून व्यक्त केले जात हाेते.
जरांगे पाटलांचे जल्लोषात स्वागत..
मनोज जरांगे पाटील यांनी खराडीतून सकाळी पायी दिंडीला सुरुवात केली. महिलांनी औक्षण करून झाल्यानंतर नगर रस्त्यावर खांदवेनगर, खराडी जुना जकात नाका, दर्गा, खराडी बायपास चौक, चंदननगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, टाटा गार्डरूम, विमाननगर चौक, रामवाडी चौक येथे महिला, लहान थाेर, मोठे सर्वच जरांगे पाटलांची वाट सकाळी ७ वाजेपासून पाहत होते. सर्वत्र तुफान गर्दी असतानाही महिलांनी रस्ता सोडला नाही. सर्वच चौकात समाज बांधवांसाठी जेवण, नास्ता, पाणी, बिस्कीट, कानटोपी वाटप सर्व व्यवस्था विविध मंडळे, संघटनांनी केली होती.
बैठकीचे टाईमलाईन
पहाटे ४:४५ वाजता : वाघोलीत आगमन
पहाटे ५ वाजता : नियोजित स्थळी जाहीर सभा
नंतर विश्रांती
सकाळी १० वा. : भोजन
११ वाजता पुढील प्रवासाला मार्गस्थ
दुपारी १२:४५ वा. खराडी बायपास येेथे आगमन
दुपारी ३ वाजता : विमाननगर
३:३० वाजता : रामवाडी येथे भाषण
४:४५ ला : येरवडा