पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. यावेळी 'पाकिस्तान झिंदाबाद' घोषणा दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या का, याचा तपास करण्यात येणार असून, बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (पीएफआय)च्या कार्यकर्त्यांनी जर पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा केली असेल, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. त्याप्रमाणे आदेश पुणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना रविवारी दिली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत हाेते. राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) देशभरात पीएफआय विरोधात कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईचे पडसाद पुण्यात उमटले. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी कारवाई विरोधात घोषणाबाजी केली. त्यामध्ये कथित पाकिस्तानसमर्थक घोषणाबाजीवरून फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले, पीएफआयबाबत चौकशी करण्यात येत आहे. जर पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद, अशा घोषणा दिल्या गेल्या असतील, तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यांच्यावर देशद्रोहाच गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याबाबत तपास करण्यात येत आहे. जर तसे काही आढळून आले, तर पुणे पोलीस आयुक्तांना संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
...तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते एकत्र करून आम्ही त्याचे फॉरेन्सिक करणार आहोत. बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरुन जे काही व्हिडिओ आहेत ते तपासातून निष्पन्न होत आहेत. त्या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील जे काही कलम असतील ते आम्ही ऍड करणार आहोत. पोलिसांची कडक भूमिका आहे जे लोक निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे.