पुणे : आता वैचारिक लढाईचे स्वरूप बदलले आहे. अस्त्र बदलतात; पण प्रवृत्ती तीच असते. जे आहे ते तसे नाही असा भ्रम उत्पन्न केला की त्याला म्हणतात परर्सेप्शन. आता फॅक्ट आवश्यक नसून इंटरप्रिटेशन महत्त्वाचे. म्हणून या लढाईत सर्वांनाच लढावे लागेल. भ्रमाचा पडदा फाडावा लागेल व डाव्या विचारसरणीविराेधात लढा उभा करावा लागेल, असे मत सरसंघचालक माेहन भागवत यांनी व्यक्त केले.
अभिजित जाेगलिखित व दिलीपराज प्रकाशन प्रकाशित ‘जगाला पाेखरणारी वाळवी’ या पुस्तकाचा प्रकाशन साेहळा सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बाॅयाेसिसच्या विश्वभवन सभागृहात पार पडला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. शांतीश्री पंडित व इतर मान्यवर उपस्थित हाेते.
भागवत पुढे म्हणाले की, आपण डावी वाळवी म्हणताे. आज डाव्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. हे अहंकारी लाेक आहेत त्यांना जगावर आपली पकड हवीय. ते केवळ हिंदूविराेधी नसून जगातील सर्व मंगलांच्या विराेधी आहेत. त्यांना जे माझे आहे ते माझे; परंतु इतरांचेही मला हवे हा त्यांचा स्वभाव आहे, असे ते म्हणाले.
ज्या प्रकारे आईवडिलांकडून आपल्यापर्यंत परंपरा आली; पण, आता ती मुलांपर्यंत पाेहोचत नाही. सर्वांना मंगल करणारी आपली संस्कृती आहे. त्या मुळाकडे आपल्याला आणि आपल्या पिढीला आणावे लागेल. थाेडं डाेळे उघडून चारी बाजूला पाहिले तर लक्षात येते. गांधीजींचे हिंदस्वराज वाचा. त्यांना याची कल्पना आली. सावरकरांनाही यांची कल्पना आली हाेती.
भाषा बदलली म्हणजे भाव बदलतात. ही प्रत्येकाची लढाई आहे. त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे टेक्सबुक आहे, असे स्पष्ट करत हे सगळीकडे पाेहोचले पाहिजे. सर्व देशात जायला हवे. जाे आपल्यापेक्षा दुर्बल आहे त्याचा पाहिजे तितका उपयाेग करून घ्यायचा आणि त्याला फेकून द्यायचे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, असा विचाराचा पाया असल्याचीही टीका त्यांनी केली.