---
सुपे : सुपे शेतकरी बचत गट आणि शेतकरी कंपनी निर्माण करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तर येथील शेतकऱ्यांना शेतीप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली.
बोरकरवाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. जागतिक मृदा दिन निमित्त राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत तालुका कृषी विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन बोटे बोलत होते.
कांदा चाळी निर्माण करण्यासाठी येथील शेतकऱ्यांना विशेष सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विवेक भोईटे यांनी दिली. तसेच मातीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी माती परिक्षण केले. तर शेतकऱ्यांना मृदा आरोग्य व कांदा पीक उत्पादनावर येत असलेल्या समस्याविषयी भोईटे यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर विवेक भोईटे यांनी कांदा या पिकावर पीएचडी केल्याबद्दल त्यांचा शेतकऱ्यांच्यावतीने यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. बोरकरवाडी गाव कांदा उत्पादनामध्ये जिल्ह्यात अग्रेसर असल्याने कांदाचाळीसाठी मोठ्याप्रमाणावर अनुदान देण्यात यावे अशी माहिती शेतकरी शरद मचाले यांनी दिली. तसेच पुढिल महिण्यात ऊस पिकासंदर्भात परिसंवाद घेण्यासाठी कृषी केंद्राने मार्गदर्शन करावे अशी मागणी बहुसंख्य शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, उपसरपंच संतोष बोरकर, मा. उपसरपंच दतात्रय कदम, राजेंद्र बोरकर, शिवाजी माने, ग्रा. पं. सदस्य सारिका बोरकर, मंडल कृषी अधिकारी सुभाष बोराटे, कृषी पर्यवेक्षक विजय चांदगुडे, कृषी सहायक प्रविण चांदगुडे, नेमाजी गोलाडे, पी. व्ही. चांदगुडे, राहुल लोणकर, शिवाजी चांदगुडे, बबन नाना बोरकर आदींसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्तात्रय पडवळ यांनी केले. सुत्रसंचालन अमोल लोणकर यांनी केले तर आभार शिवाजी बोरकर यांनी मानले.