पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून मला दहा दिवस झाले. मी आजपर्यंत राज ठाकरे व अमित ठाकरे यांना कधीच डिवचले नाही व आयुष्यात असे कधीही करणारही नाही. मी एकला चलो रे च्या भूमिकेत असून त्यावर ठाम आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी आपल्या अपक्ष उमेदवारीचा पुर्नउच्चार केला.
पत्रकारांशी बोलताना मोरे म्हणाले, भाजप सत्ताधाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात शहराचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. एवढे होऊनही लोकसभा निवडणुक एकतर्फी होणार अशी वल्गना केली जात असेल तर, जोपर्यंत वसंत मोरे पुणे शहरामध्ये आहे तोपर्यंत ही निवडणुक एकतर्फी होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मी मनसेतून बाहेर पडलो ते कुठल्या पक्षात जाण्यासाठी नाही. मुळातच मी लोकसभा निवडणुक लढविण्यावर १०० टक्के ठाम आहे. मध्यंतरीच्या काळात मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. यात पुणे शहरात लोकसभा निवडणुकीत एकत्र येऊन कशाप्रकारे मोट बांधता येईल यावर चर्चा केली होती. अजून निवडणुकीची रंगत येण्यास वेळ आहे. पण ही निवडणुक मी एकतर्फी होऊ देणार नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून पाईपलाईनमध्ये होतो. सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता पुढे जात असताना नक्की माशी कुठे शिंकली, किती जण आडवे आले, या वाटेमध्ये कोणी कोणी काटे टाकले या सर्व गोष्टी मी पुराव्यानिशी सार्वजिक व्यासपीठावरून सांगणार आहे. दरम्यान पुण्यातील निवडणुक एकतर्फी होणार असती तर मला वरिष्ठ पातळीवरून फोन आले नसते असेही ते म्हणाले.