पुणे : तळजाई टेकडीवरचा जैवविविधतेने समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. याविषयी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यावरणप्रेमींनी बुधवारी निवेदन देऊन टेकडी वाचविण्यासाठी निवेदन दिले. त्यावर प्रकल्पाची माहिती घेऊन चौकशी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास विरोध असल्याबाबत आणि नदी - नाले यांचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्री ठाकरे यांना दिले. पर्यावरणमंत्री म्हणून हे प्रकल्प रद्द करावेत तसेच येथील निसर्ग संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि जसे मुंबईचा ऑक्सिजन म्हणजे आरे वाचविले. त्याच धर्तीवर पुण्यातील ऑक्सिजन म्हणजेच तळजाई टेकटी वाचवावी अशी विनंती करण्यात आली.
पुणे शहरातील मध्यभागातून वाहणारा मुख्य नाला आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रहाव बदलण्याचा घाट पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जिवित व वित्त हाणी होऊ शकते त्यामुळे आपण याकडेदेखील लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली. तसेच पूररेषांचे नकाशे आणि नदीकाठच्या भागातील बांधकाम परवानगी याविषयावर देखील लक्ष घालण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली.
सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ (एकशे सात एकर) जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करून या प्रकल्पास १२० कोटी खर्च केला जाणार आहे. त्यामुळे येथील जागेचे कॉंक्रिटीअकरण होउन नैसर्गिक अधिवास संपुष्टात येण्याबरोबरच पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे. तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावणप्रेमींना वाटत आहे.