राजगुरुनगर: पुणे -नाशिक रेल्वेसाठीशेतकरी जमिनी देण्यास तयार आहे. मात्र कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून देणार नाही. जमिनीला काय भाव देणार असे विचारल्यावर अधिकारी उत्तर देत नाहीत. पोलिस बळाचा वापर करू नका, शेतकऱ्यांचा नाद करु नका. आमच्या मागण्या मान्य करा, तरच मोजणी करा असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.
होलेवाडी मांजरेवाडी या परिसरातुन देशातील पहिली पुणे -नाशिक हाय स्पीड रेल्वे जाणार आहे. यासाठी भुसंपादनाचे काम सुरू झाले आहे. रेल्वे अधिकारी व खेड महसुल विभाग शेतकऱ्यांच्या तालुक्यातील रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांना रेल्वे भुसंपादनाची प्रक्रीया समाजावून सांगत होते. शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पासाठी घेणार आहे. मात्र जमिनीला काय भाव देणार, रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुला रेड झोन असल्यामुळे शेतकरी भुमीहिन होणार आहे. त्यांचा योग्य तो मोबदला काय देणार असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना बैठकीदरम्यान विचारत होते. मात्र शेतकऱ्यांना यांचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्याकडून मिळाले नाही.
रेल्वे मार्ग २५ मीटरचा होणार आहे. तसेच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजुने ३० मीटर अंतरादरम्यान रेडझोन पडणार आहे. रेड झोनमध्ये यापुढे शेतकऱ्याला कुठलाही उदयोग धंदा, घर बांधता येणार नाही. त्या जमिनीची किंमत शुन्य होणार आहे. त्याबदल्यात मिळणारा मोबदला तुंटपुजा आहे. त्यामुळे रेडझोनसाठी लागणारी जमीन रेल्वेने घ्यावी. व गेल्या तीन चार वर्षातील खरेदी विक्रीचे व्यवहार व खुल्या बाजारातील व्यवहार त्यांच्या पाच पट शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा हि मागणी मान्य करून रेल्वे मार्गात येणाऱ्या विहिरी, फळझाडे, पाईपलाईन यांचाही योग्य मोबदला द्यावा. तो किती देणार हे अगोदर सांगून मग मोजणी करा. पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका.या परिसरातील सेझ प्रकल्प, राजगुरूनगर शहराबाहेरील पुणे -नाशिक बाह्यवळण यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन करून प्रशासनाला वठणीवर आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा नाद करू नका असा सज्जड दम शेतकऱ्यांनी रेल्वे आधिकाऱ्यांना दिला.
शेतकऱ्यांवर अन्याय केला जाणार नाही
शेतकऱ्यांची समस्या, मागणी व भावना वरिष्ठापर्यत पोहचून शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, तोपर्यत या परिसराची मोजणी केली जाणार नाही.असे यावेळी पुणे महारेल्वेचे जनरल मॅनेजर अधिकारी सुनील हवालदार यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नवनाथ होले, अनुप टाकळकर, सुशिल मांजरे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.