बाभुळगाव: उजणी धरणातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी मंजुरी मिळाल्याचे जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील काही भाजपच्या दलालांनी गाव गुंडाना पुढे करून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना बदनाम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच भरणे यांच्या कामकाजाविषयी रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप करून टीका करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु इथुन पुढे दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका करणार्यांना जशास तसे उत्तर देणार. असा इशारा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिला आहे.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ इंदापूर तालुक्यातील सुगावमध्ये उजणी जल पात्रात पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संजय सोनवणे बोलत होते.
सोलापूर जिल्ह्यातील काही तथाकथीत बाजारबुनगे हे चिरीमीरीसाठी दलालीचे काम करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत. उजणीच्या पाच टीएमसी पाण्याचा मुद्दा पुढे करून भरणे यांच्या बदनामीसाठी जिल्ह्यात अपप्रचार सुरू आहे. आंदोलने करून चर्चेत राहण्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन पालकमंत्री यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना पिपल्स रिपब्लीकन पार्टी कदापी खपवून घेणार नसल्याचे सोनवणे यांनी सांगितले.