इंदापूर: ज्या लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे, ते लोक तुम्हाला दमदाटी करत असतील, तर तुम्ही चिंता करू नका. शरद पवार कायम तुमच्या पाठीशी राहील. इंदापूर तालुक्यात कोणी सत्तेचा गैरवापर केला, तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन दिवसांत करू शकतो, अशा शब्दात शरद पवार यांनी आज (दि.५) विरोधकांना सज्जड इशारा दिला. बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार खा.सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ही सभा झाली. शरद पवार पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील द्राक्ष शेती करणारांची आमच्या पक्षाला सहकार्य करण्याची इच्छा आहे. मात्र तसे केल्यास त्यांच्या शेतीचे पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. शेतीचे पाणी हे काही बापजाद्याची इस्टेट नाही. कुणी नोकरी टिकणार नाही म्हणतात. दमदाटी व दहशतीने त्यांना हव्या त्या रस्त्याने लोकांना नेण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही जणांना शक्ती व पाठिंबा देण्याची गरज असते, तशी भूमिका आम्ही घेतली. आज त्यांचे पाय जमिनीवर नाहीत. पाय आणि डोके हवेत आहे, अशा शब्दात पवार यांनी नाव न घेता अजित पवार व आ. दत्तात्रय भरणे यांचा समाचार घेतला.
जनतेच्या सुखदुःखाशी समरस होणारी नीती घेऊन देशाचा कारभार करण्याची आज आवश्यकता आहे. ती यशस्वीपणे करायची असेल तर भाजपचा पराभव करण्याखेरीज गत्यंतर नाही, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा आहे. त्यांना भाजपला सत्तेतून बाजुला करुन नव्या विचारांच्या हातामध्ये तो बदल द्यायचा आहे. सर्वांच्या सामुदायिक शक्तीने आज इंदापूर तालुक्यात तुमच्या हातात सत्ता येईल यात काही शंका नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दौंड व इंदापुरात पाण्याबद्दल प्रचंड उलट-सुलट भाषणे होत आहेत. कुणी ही पाण्याची धमकी दिली, तर त्याचा नंबर मला पाठवा. हे कुणाच्या घरचं पाणी नाही.तो राज्याचा विषय आहे.पाण्यावर सरकारचा नाही, तर देशातील शेतकऱ्याचा पहिला अधिकार आहे. चारशे पारच्या निमित्ताने संविधान बदलण्याचे पाप विरोधकांच्या मनात आहे.यातून पाणी बंद करू वगैरे भाषणे होत आहेत, अशा त्या म्हणाल्या. अमोल कोल्हे म्हणाले की, नीती व नियत गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शरद पवार यांनी शेतक-यांची ७१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. तर भोपाळ मध्य पंतप्रधान्ह नरेंद्र मोदी यांनी कुठल्या तरी वेगळ्या विषयात ७० हजाराचा आकडा सांगितला त्यावर काहींनी आपली भूमिका बदलली.मात्र दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानाने लढतो, हे अनिल देशमुख यांनी दाखवून दिले.