पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पोलिसांनी लागू केलेल्या संचारबंदीचा मंगळवारी चांगला परिणाम दिसत आहे. वाहतूक पोलिसांच्या अंदाजानुसार जवळपास ९५ टक्के पुणेकर हे घरात थांबण्यास पसंती दिली आहे. केवळ ५ टक्केच लोक घराबाहेर पडत आहे. या लोकांनीही घरी थांबावे, यासाठी पोलीस आणखी कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. शहरात सकाळी दुध व भाजीपाला आणण्यासाठी मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडले होते. मार्केटयार्डमध्ये भाजीपाला घेण्यासाठी लांबून लांबून लोक आले होते. त्यामुळे मार्केटयार्डबरोबरच इतर ठिकाणी गर्दी दिसून येत होती. मार्केटयार्डला जाणारे आणि तेथून भाजीपाला घेऊन येणार्यांची परिसरात सर्वत्र गर्दी जाणवत होती. सकाळी ८ वाजल्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी झाली. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरु आहे. पोलीस उपायुक्त आपापल्या भागात फिरुन बंदोबस्ताचा आढावा दर दोन तासांनी घेत आहेत. मंडईमध्येही सकाळपासून ग्राहकांची गर्दी होती. भाजी घेण्याबरोबरच उद्या साजरा होणार्या गुढीपाडव्यासाठी साखरेच्या गाठ्या घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.तरुण, लहान मुले गल्लीबोळ्यात गर्दी करुन बसताना दिसतात़ पोलीस व्हॅन दिसली की आत पळून जातात, असे मध्य वस्तीत दिसून येत आहे. पोलीस व्हॅनवरुन लोकांनी घरातच थांबावे, असे आवाहन करीत आहेत.
हम होंगे कामयाब! ९५ टक्के पुणेकरांची घरात थांबण्यास पसंती : वाहतूक पोलिसांचा माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 1:40 PM