पुणे : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांना राज्यात कुठेही सभा घेण्याचा अधिकार आहे. त्यातून ते त्यांची भूमिका मांडत आहेत. राज्य सरकारला दिलेल्या चाळीस दिवसांची मुदत पुढील दहा दिवसांनी संपणार आहे. त्यानंतर त्यांची ते भूमिका पुन्हा मांडणार आहेत. त्यावेळी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत सर्वांची मते जाणून घेण्यात आली. त्यात सध्याच्या आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला आरक्षण द्यावे, असे त्या बैठकीत ठरले होते. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात यापूर्वी दिलेले आरक्षण नाकारण्यात आले आहे. त्यातील त्रुटी दुरुस्ती करून कायद्याच्या चौकटीत ते कसे बसेल या संदर्भात काम सुरू आहे, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी शिंदे समिती नेमलेली आहे त्यांचाही या संदर्भात अभ्यास सुरू आहे. मात्र, मागास आयोगाने मराठा समाजाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यास करावा असे काहींचे मत आहे त्या संदर्भातील काम सुरू आहे. वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.
मी बोललो नसतो तर...
निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांनंतर तुम्ही माझी आतुरतेने वाट पाहात होता अशी मिश्किल टिपण्णी करत त्यांनी मी बोललो नसतो तर वेगळा संदेश गेला असता असे ते म्हणाले. माझा काहीही संबंध नसताना मला गोवण्यात असा आरोपही त्यांनी या वेळी केला. हा विषय पुण्यातील असला तरी तो राज्यस्तरावरचा होता. मी या संदर्भात बोललो नसतो तर अजित पवार यांची चौकशी करा त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी झाली असती. या संदर्भात नेमक्या कोणत्या गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला, बैठक कोणी घेतली ही माहिती पुढे आली आहे. बोरवणकर आणि आता मोठी नावे घेतली आहेत आता एक अजित गेला व दुसरा अजित त्यात आला आहे. असे सगळे सुरू असल्याचे ते म्हणाले. बोरवणकर यांनी नेमकी हीच वेळ का निवडली याबाबत छेडले असता मला त्याबाबत काहीही माहिती नाही. मला माझी वेळ पडलेली आहे. मला मिळालेली संधी, जबाबदारी त्यातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे.
पालकमंत्रीपद देणे मुख्यमंत्र्याचा अधिकार-
माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आजच्या बैठकीला हजर नव्हते याबाबत पवार म्हणाले त्यांना अन्य महत्वाची कामे असतील. ते अन्य दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आहेत त्यामुळे ते आले नसतील. आजच्या बैठकीबाबत संपर्क झाला नाही. मात्र भेट झाल्यानंतर दोन्ही दादांच्या एकत्रित येण्यासाठी पत्रकार प्रतीक्षा करत आहे, असे मी त्यांना जरूर सांगेल अशी मिश्किल टिपणीही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाटील यांनी पालकमंत्री पदाचा त्याग करावा लागला असे विधान केले होते, त्याबाबत अजित पवार म्हणाले, मला या संदर्भात आणखी वाद वाढवायचा नाही. मंत्रीपद देणे खातेवाटप करणे, पालकमंत्रीपद देणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यांनी त्यांचा अधिकार वापरलेला आहे असे सांगून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मागतिला तर सल्ला देईल-
पुणे जिल्हा सहकारी बँकेचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांना संचालक म्हणून संधी मिळेल का याबाबत त्यांनी बोलणे टाळले. संचालकाच्या रिक्त जागेवर उरलेले संचालक निर्णय घेतील असे सांगून गेली ३१ वर्षे मी बँकेत काम करत होतो, बँकेला माझा सल्ला किंवा मदतीची गरज भासल्यास नियमाच्या चौकटीत राहून, मागितला तरच सल्ला देईल असे ते यावेळी म्हणाले.