नारायणगाव : रुग्णांच्या नातेवाईकांना वैयक्तिकरित्या रेमडीसिवीरची मागणी अथवा आणण्यास सांगू नये अन्यथा संबंधित व्यक्तींसह कोविड सेंटरवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
डॉ. कोल्हे यांनी आज आमदार अतुल बेनके यांच्यासह सोमतवाडी, लेण्याद्री, शिरोली, ओझर आणि आळे येथील कोविड सेंटरला आज ( दि.२९) भेट देऊन पाहणी केली.
यावेळी खा. डॉ. कोल्हे यांनी दाखल रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यांशी वैद्यकीय उपचार, जेवण आणि अन्य सुविधांबद्दल संवाद साधला. यासोबतच त्यांनी कोविड सेंटरवर सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाले की, ''कोविड टास्क फोर्सच्या नियमावली प्रत्येक जिल्हा कोविड केअर सेंटरच्या बाहेर सूचना फलकावर लावाव्यात. तालुक्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची नोंदणी करावी. रेमडीसिवीर इंजेक्शनचे योग्य त्या रुग्णांस वाटप व प्रत्येक कोविड सेंटरची नोंदणी तालुका डॅश बोर्ड नोंद ठेवावी. कोविड हेल्पलाईन नंबर २४ तास ऍक्टिव्ह ठेवून रुग्णांना योग्य ते सहकार्य करावे. रुग्ण थेट कोविड सेंटरवर आल्यावर त्याची प्राथमिक तपासणी केल्याशिवाय कोणतेही चुकीचे मार्गदर्शन करू नये. मध्यंतरीच्या काळात ऑक्सिजन उपलब्धतेबाबत कमतरता भासत होती, पण आता त्यामध्ये सुधारणा होत आहे. लवकरच पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती विशाल तांबे, लेण्याद्री देवस्थान ट्रस्टी जितेंद्र बिडवई, जि.प.सदस्या सौ.आशाताई बुचके, जि.प.सदस्य देवराम लांडे, माजी जि.प. सदस्य भाऊ देवाडे, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश आगम , जिल्हा पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, कोविड केअर सेंटरमधील कर्मचाऱ्यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
--
२९ नारायणगाव : कोवीड सेंटरची पाहणी करताना खा. डॉ. अमोल कोल्हे , आमदार अतुल बेनके